कोल्हापुरला अवकाळीने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर -  दिवसभराच्या उकाड्यानंतर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहर आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. जिल्ह्यातही काही ठिकाणी हा पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. भात काढणीसह गुऱ्हाळ घरे, ऊस तोडणीवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

सध्या थंडीचे दिवस आहेत. गेल्या आठवड्यात दोन दिवस जोरदार थंडी पडली. मात्र, दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. थंडीऐवजी उकाडा सहन करावा लागत आहे. आजही थंडी नव्हतीच. सकाळी उशिरापर्यंत आणि दुपारी काही काळ पावसाळी वातावरण निर्माण झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर मोठा पाऊस झाला. या पावसामुळे फेरीवाल्यांची तसेच बाजारहाटसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी बहुतेकांनी स्वेटर, कानटोपी, हातमोजे जवळ ठेवले आहेत. पण पाऊस आल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पाऊस थांबपर्यंत अनेकजण मिळेल त्या आडोशाला उभे होते.

जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस झाला. त्याचा परिणाम भात काढणीवर होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय काही भागात गुऱ्हाळघरे सुरू आहेत. त्यांच्यावरही तसेच कारखान्यांच्या ऊसतोडीवरही परिणाम होऊ शकतो. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बदलत्या वातावरणाचा अनुभव येऊ लागला आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

Web Title: rain in kolhapur