esakal | निपाणीत पावसाचा हाहाकार! | Paschim Maharashtra
sakal

बोलून बातमी शोधा

nipani

निपाणीत पावसाचा हाहाकार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : आठवडाभर उन्हाचा तडाखा बसून सोमवारी (ता. ११) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शहर आणि परिसरात हाहाकार उडाला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील शिवाजीनगर सहाव्या गल्लीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पाण्यात संसारोपयोगी साहित्य भिजण्यासह काही साहित्य वाहून गेले. शिवाय काही घरांच्या भिंतीला पाणी लागून राहिल्याने पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय शहरातील अशोक नगरासह विविध भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निपाणी शहर आणि ग्रामीण भागात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील रस्त्यावरून गटारीचे पाणी तुंबुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. येथील शिवाजीनगर सहाव्या गल्लीमध्ये गांधी हॉस्पिटलकडून आलेल्या मोठ्या गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले. त्यामुळे हे पाणी घराबाहेर काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच गल्लीत काही साहित्य पाण्यातून वाहून जात होते. यापूर्वी येथील नागरिकांनी नगरपालिकेला बऱ्याचदा कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शिवाजीनगर सहाव्या गल्लीतील सामान्य कुटुंबातील लहान लहान घरांमध्ये पाणी घुसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी लहान मुले व वृद्ध महिलांना दुसऱ्यांच्या घरात बसवावे लागले. त्यामुळे या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. रस्त्याची उंची जास्त आणि गटारीची उंची कमी असल्याने येथील घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला.

शिवाजीनगरातील घटनेची माहिती मिळताच नगरपालिका पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ त्या निवारण्याची ग्वाही दिली.

याशिवाय शहरातील विविध भागात पावसाने झोडपून काढल्याने फेरीवाले व शहरवासीयांची मोठी गैरसोय झाली. ग्रामीण भागातही हा पाऊस झाल्याने तंबाखू आणि उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले. तर उर्वरित सोयाबीन आणि ऊस आडवे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. एकंदरीत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले आहे.

loading image
go to top