मराठीला अभिजात दर्जा हवाच 

मराठीला अभिजात दर्जा हवाच 

27 फेब्रुवारी... "कुसुमाग्रज' तथा वि. वा. शिरवाडकर या मराठी भाषेच्या गळ्यामधील कौस्तुभमणी असलेल्या श्रेष्ठ साहित्यिकाचा जन्मदिवस... आपण "जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. राज्य शासनही हरप्रकारे भाषा प्रसार व संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे; पण एक खंत सातत्याने मराठी मनाला टोचणी देत राहते, ती मराठीला हवा असणारा अभिजात दर्जा. आतापर्यंत संस्कृत, तमिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम्‌ या भाषांना केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा दिला आहे. मराठी भाषा मात्र अनेक वेळा मागणी होऊनही आजही उपेक्षितच राहिली आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यास मराठी भाषा संवर्धनास भरीव अनुदान केंद्राकडून मिळेल. मराठी भाषेला अधिकृत भाषा म्हणून राजमान्यतेची गुणवत्ता प्राप्त होऊन तिचे श्रेष्ठत्व जगभर सर्वमान्य होईल. 


मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सखोल संशोधन व पुरावे एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समिती निर्माण केली. त्यामध्ये मराठी भाषातज्ज्ञ व भाषेसंबंधित कार्यरत असणाऱ्या प्रातिनिधिक संस्था संचालकांचा समावेश करण्यात आला. या समितीचे समन्वयक म्हणून सर्व जबाबदारी प्रा. हरी नरके यांनी समर्थपणे सांभाळली. याचा संपूर्ण अंतिम अहवाल 31 मे 2013 रोजी राज्य शासनाकडे या समितीने सुपूर्द केला. यामध्ये केंद्राच्या भाषेच्या अभिजात दर्जासाठी अभिप्रेत असलेल्या सर्व निकषांचा आढावा व आवश्‍यक पुरावे यांचा समावेश केला आहे. यामध्ये भाषेची प्राचीनता स्पष्ट करताना 2220 वर्षांपूर्वीच्या ब्राह्मी भाषेतील उपलब्ध शिलालेखाचा आधार घेतला आहे. मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ "गाथासप्तशती' हा सुमारे 2000 वर्षे जुना असल्याचे पुराव्यादाखल नमूद केले आहे. अनेक शतके उलटल्यानंतरच मराठी भाषा अतिशय प्रगल्भ व समृद्ध होऊन "लीळाचरित्र' व "ज्ञानेश्‍वरी'सारखे मराठी भाषेच्या प्रगल्भतेचे साक्षीदार ग्रंथ निर्माण झाले आहेत. 

नाणेघाटातील ब्राह्मी लिपीतील 2220 वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील "महारट्टीनो' हा उल्लेख जसा मराठीचे अस्तित्व अधोरेखित करतो तसेच दीपवंश, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचा उल्लेख मराठीचा कालखंड निश्‍चित करतो. महाभारत, रामायण, गुणाढ्याच्या बृहत्‌ कथा यामध्ये उल्लेखलेले असंख्य मराठी शब्द हे जसे मराठी समृद्धतेचे दर्शन घडवितात तसेच वररुचीचे प्राकृत प्रकाश, हेमचंद्राची देशीनाम माला, शाकुंतल, मृच्छकटिकातील प्राचीन मराठी भाषेतील संवाद हे मराठीच्या प्राचीनतेचे सबळ पुरावे मराठीचा अभिजात दर्जा मान्य करण्यास पुरेसे आहेत. 

महाराष्ट्र या देशनामापेक्षा महाराष्ट्री म्हणजेच मराठी भाषा जुनी आहे, हे अश्‍मक, कुंतल, अपरान्त, विदर्भ या प्रदेशात प्राकृत महाराष्ट्रीय प्रचारात असल्याने स्पष्ट होते. सातवाहनाच्या राजवटीत प्राकृत मराठी कुरुक्षेत्र, पेशावर इथपर्यंतच्या प्रदेशात प्रचलित होती. याचे ऐतिहासिक पुरावेही या समितीच्या अहवालाने स्पष्ट केले आहेत. 

हर्मन याकोबी या जर्मन अभ्यासकाने जैन प्राचीन आगम ग्रंथ "जैन महाराष्ट्री' भाषेत लिहिलेले आहेत. प्राचीन श्‍वेतांबर ग्रंथ जरी "अर्धमागधी' भाषेत असला तरी इ. स. 3 पासून जैन लेखकांवर महाराष्ट्रीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भद्रबाहू व पादलिप्तांनी जैन महाराष्ट्रीत लेखन केले आहे. यावरून तिसऱ्या शतकातही मराठी भाषा भारतातील मोठ्यात मोठ्या प्रदेशातील जास्तीत जास्त लोकांना अवगत होती. यामुळे जैन धर्म प्रसारकांनी व लेखकांनी तिचा प्रगल्भ साहित्यभाषा म्हणून स्वीकार केल्याचे स्पष्ट होते. 

तरी अभिजात दर्जासाठी, मराठी मनांच्या सन्मानासाठी मराठी माणसानेच आता पुढाकार घेऊन आत्मसन्मानाची लढाई लढणे भाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com