आता घरबसल्या उसाच्या नोंदी; राजारामबापू कारखान्याचा उपक्रम

आता घरबसल्या उसाच्या नोंदी; राजारामबापू कारखान्याचा उपक्रम

इस्लामपूर - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घरबसल्या गेल्या 5 वर्षांतील उसाच्या नोंदी, वजन व बिलाची माहिती देण्यासाठी अॅप विकसित केले आहे. या "राजारामबापू कारखाना अॅप'चे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

कारखान्याने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संदेश (एसएमएस) व आवाजाद्वारे (आयव्हीआर) एका वर्षाचे उसाचे वजन व बिलाची माहिती देणारी "संगणकीय प्रणाली'ची सेवा दिली आहे. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून या सेवा-सुविधा दिल्या जात आहेत. 

या अॅपचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. गुगलच्या "प्ले स्टोअर' किंवा कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचाऱ्याकडून डाऊनलोड केले जात आहे. ते मोबाईलमध्ये चालू केल्यानंतर मिळालेला शेतकरी कोड व ऊस नोंदीच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर फीड केल्यानंतर कारखान्याकडून पासवर्ड दिला जातो. तो फीड केल्यास शेतकऱ्यांना चालू वर्षासह मागील 5 वर्षांची अद्ययावत माहिती उपलब्ध होते. या व्यवस्थेतून शेतकऱ्यांना विविध उपक्रम व संबंधित बातम्याही दिल्या जाणार आहेत. 

शेती विभागासाठी हे मोबाईल अॅप विकसित केलेले आहे. ऊस नोंदी व ऊसतोडीमध्ये बऱ्याच वेळा तक्रारी रहातात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कारखान्याने "केन मॅनेजमेंट सिस्टीम' (सीएमएस) ही अद्ययावत प्रणाली स्वीकारली आहे. यामध्ये शेती विभागातील गटाधिकारी, स्लिप बॉय, फिल्डमन तसेच शेती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 250 अँड्रॉईड मोबाईल दिले आहेत.

कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उसाची जात, लागण तारीख व ऊस क्षेत्राची नोंद घ्यायची आहे. या सिस्टीमचे वैशिष्ट्य हे आहे, की कर्मचारी मोबाईल घेऊन ऊस क्षेत्राभोवती फिरला, की अचूक क्षेत्रफळ मिळते. त्यामध्ये कमी-जास्त करण्याचा प्रश्‍नच येत नाही. यामुळे शेती विभागातील कर्मचारी कुठे आहे, त्याचे काय काम चालू आहे? याचीही माहिती मिळणार आहे. 

आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्ययावत प्रणालींची सेवा देत आहोत. ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

- पी. आर. पाटील, कारखान्याचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com