राजेंद्र शेळके यांना राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

shelke
shelke

नागठाणे - शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, साध्या पत्र्याच्या घरात वाढलेल्या, गावातल्या प्राथमिक शाळेत शिकलेल्या राजेंद्र शेळके यांना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला. ही बातमी गावात धडकताच आपल्या सुपुत्राच्या यशाने शेळकेवाडी कौतुकात चिंब झाली.

शेळकेवाडी (सातारा) हे अत्यंत छोटेसे गाव. साताऱ्या नजीक काही अंतरावरच वसलेले. राजेंद्र शेळके या गावचे सुपुत्र. त्यांनी रोईंग या खेळाच्या माध्यमातून मोठा लौकिक संपादन केला. अर्थात त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीने भरलेला आहे. आई समिंद्रा अन् वडील प्रल्हाद शेतीत राबणारे. पुढे शेळके हे लष्करी सेवेत रुजू झाले. तिथेच त्यांना रोईंग या खेळाची आवड निर्माण झाली. 1994 मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकाविले आहे. त्यावर्षीच त्यांना राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही गौरविण्यात आले. निवृत्तीनंतर ते प्रशिक्षणाकडे वळले. त्यादृष्टीने चीन येथे त्यांनी प्रशिक्षणविषयक अभ्यासक्रमही यशस्विरित्या पूर्ण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर घडलेले कित्येक खेळाडू ऑलिंपिकपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
 त्यांच्या सायली अन् स्नेहल या दोन्ही मुलीही या खेळात निष्णात आहेत. त्यांनीही राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे. सुवर्णपदक पटकाविले आहे. शेळके यांची गावाशी असलेली नाळ आजही घट्ट आहे. 'राजेंद्र हे नुकतेच गावी येऊन गेले. त्यांच्याशी गप्पागोष्टीही झाल्या. त्यांनी कर्तृत्वाच्या बळावर छोट्या गावाचे नाव मोठे केले. याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ संभाजी शेळके यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

पुरस्काराने मनोमन आनंद झाला. आजवरच्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यात आई- वडिल, कुटुंबीय, लष्कर, असोसिएशन अन् फेडरेशन यांचा वाटा मोलाचा आहे.
- राजेंद्र शेळके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com