सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून प्रश्‍न मार्गी लावणार - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून, सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. 

- राजू शेट्टी

जयसिंगपूर - लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून, सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने चळवळीत सक्रिय राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

शेतकऱ्यांवर लादलेली तीस हजार कोटींची वीज बिले चुकीच्या पद्धतीने लादण्यात आली आहेत. याविरोधात कृषीदिनी एक जुलै रोजी कोल्हापूर येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.

उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ते म्हणाले, ‘शासनाची फसल विमा योजना फसवणूक असून राज्यातून सलग दोन वर्षे दुष्काळ असताना विमा कंपन्यांना वीस हजार कोटीचा नफा होतोच कसा? शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे.’’

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ३१ मेअखेर २४४ कोटींची एफआरपी थकीत आहे. यामध्ये भाजप, शिवसेनेचे दहा कारखाने असून त्यांचे १८९ कोटी रुपये थकीत आहेत. काँग्रेसच्या दोन कारखान्यांचे ११ कोटी ३२ लाख थकीत आहेत. खासगी तीन कारखान्यांचे ४३ कोटी थकीत आहे. यात सर्वात जास्त थकीत रक्कम भाजप, शिवसेनावाल्यांची आहे.

म्हणूनच मी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कारखानदारांच्या मांडीला-मांडी लावून रक्कम वसूल करायला बसलोय. मागील आंदोलनात चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांची वीज बिले तपासून दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, कार्यवाही झाली नाही. तीस हजार कोटीची वीज बिले लादण्यात आली आहेत. कृषीदिनी होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी ताकद दाखवून द्यावी.’’

भगवान काटे, जालिंदर पाटील, भागवत नरवाडे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सावकर मादनाईक, रामचंद्र शिंदे, मन्सूर मुल्लाणी, प्रा.राजाराम वरेकर, मिलिंद साखरपे, आदिनाथ हेमगिरे, सुरेश कांबळे उपस्थित होते. 

६ जुलैपासून चिंतन मेळावा
लोकसभेतील पराभव आणि भविष्यातील संघटनेच्या वाटचालीबाबत संघटनेचा सहा व सात जुलैला आंबा येथे चिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetti comment