Vidhansabha2019 : चर्चा न झाल्यास ‘एकला चलो रे’ - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

कोल्हापूर - राज्यात भाजप-सेना युतीचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करणे, ही काँग्रेस-राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने त्यांनी मनसे व वंचित आघाडीशी चर्चा करावी. त्यांनी चर्चा केली नाही तर आम्ही देखील स्वतंत्रपणे विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. वंचित आघाडीसह इतर मित्रपक्षांतील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. त्याबाबत लवकरच मुंबईत बैठक घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘राज्यात भाजप-शिवसेना फोफावण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी जबाबदार आहेत. युतीला थोपवायचे असेल तर मित्रपक्षांना एकत्र घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे यांच्या मनसेशी व प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची जबाबदारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे; मात्र त्यांच्याकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही. महाआघाडी करण्यासाठी होत असलेल्या बैठकांमध्येही ताळमेळ नाही. या पक्षांची अशीच भूमिका राहणार असेल तर स्वाभिमानीही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा विचार करेल.’’  

ते म्हणाले, ‘‘भाजप-शिवसेनेला पराभूत करणे, हा सर्व विरोधी पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. यासाठी महाआघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र या आघाडीत मनसे व वंचित बहुजन आघाडी यांना घेण्यासाठी आपण आग्रह धरला आहे. हे दोन्ही पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर आपणही स्वतंत्रणपणे या दोन्ही घटकांना एकत्र करून लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणताही वेळ न दवडता या पक्षांशी चर्चा करावी. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हा विषय गांभीर्याने हाताळतील, अशी अपेक्षा आहे. त्यातूनही या विषयाकडे दुर्लक्ष केले तर आम्हालाही विधानसभा निवडणूक लढण्याचे इतर पर्याय खुले आहेत.’’

‘वंचित’ संपर्कात; नवे समीकरण शक्‍य
वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत चांगली कामगिरी केली आहे. त्याचा विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी फायदा होणार आहे; मात्र त्यासाठी त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. आजघडीला ‘वंचित’ला एकट्याने लढून मोठी कामगिरी करता येणार नाही, याची जाणीव दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे एकत्रित निवडणूक लढण्याचा आग्रह आहे. वंचितचे काही नेते चर्चेसाठी तयार आहेत. त्यामुळे एखादे नवीन राजकीय समीकरण तयार झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही, असेही श्री. शेट्टी म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetti comment