हे कच्च मडकं नको तेवढा भाव खाऊ लागलयं - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

 सदाभाऊ खोत या व्यक्‍तीबद्दल माझी बोलण्याची इच्छा नाही. आम्ही जी काही मडकी घडवली, त्यातील एक मडकं कच्च निघालं ते म्हणजे सदा. हे कच्च मडकं चुकीच्या पध्दतीने बाजारात गेले आणि आता नको तेवढा भाव खाऊ लागलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. यावर आपणाला जादा काही बोलण्याचा इच्छा नाही,

- राजू शेट्टी

कोल्हापूर -  सदाभाऊ खोत या व्यक्‍तीबद्दल माझी बोलण्याची इच्छा नाही. आम्ही जी काही मडकी घडवली, त्यातील एक मडकं कच्च निघालं ते म्हणजे सदा. हे कच्च मडकं चुकीच्या पध्दतीने बाजारात गेले आणि आता नको तेवढा भाव खाऊ लागलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. यावर आपणाला जादा काही बोलण्याचा इच्छा नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांची नाळ तुटल्याने शेट्टींचा पराभव झाला, असे मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले होते. याचा समाचार घेताना शेट्टी यांनी हे स्पष्ट केले.  

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून माझा झालेला पराभव हा अनाकलनिय आहे. जनमताचा कौल मला मान्य आहे. माझा पराभव कोणी केला या पेक्षा पराभवामागे असलेल्या प्रवृत्ती कोण आहेत, याची मला माहिती आहे. या प्रवृत्तींना, सुत्रधाराला योग्यवेळी धडा शिकवू. त्यांच्या छाताडावर शेतकऱ्याला नाचवल्याशिवाय राहणार नाही.

- माजी खासदार राजू शेट्टी

 कारखानदारांच्या कळपात कोण? 
254 कोटींची थकबाकी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आहे. 189 कोटींची थकबाकी ही भाजप - सेनेच्या कारखानदारांची आहे. तर 11 कोटींची थकबाकी ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारखानदारांची आहे. बाकीची खाजगी कारखानदारांची आहे. एकट्या वारणा सहकारी साखर कारखान्याची 100 कोटी थकबाकी आहे. त्यामुळे हे सर्व थकबाकीदार कारखानदार कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतात, कोणाच्या कळपात बसतात, ते एकदा जाहीर करावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. तसेच ही थकबाकी हातात दंडूका घेवून उतरल्याशिवाय मिळणार नाही. 

स्मार्टफोनने घात केला 
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. शेतकरी सुखावला. शेतकऱ्याच्या पोराच्या हातात स्मार्टफोन आला आणि या स्मार्ट फोनननेच आमचा घात केला असल्याचे शेट्टी म्हणाले. आरएसएसच्या विषारी प्रचाराला हे तरुण बळी पडले. जातीच्या नावाने, धर्माच्या आधारे मतदानाला प्रोत्साहन देणारे राष्ट्रवादाचा आभासी उन्माद निर्माण केला. त्याला आमची तरुण पिढी बळी पडली. ज्या बापाने कष्टातून हा स्मार्टफोन हातात दिला, त्याच्या कष्टाकडे दुर्लक्ष केले, या सर्वाचाच परिणाम झाला. लवकरच ही तरुण पिढी पुन्हा आपल्या मुळ पदावर आल्याशिवाय राहणार नाही. 

साधू-संतांची यंत्रणा भाजप प्रचारात 
अनेक साधू संत या मतदार संघात फिरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही यंत्रणा लावली होती. भाजप आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून येणे कसे गरजेचे आहे, याचा प्रचार हे साधूसंत करत होते. या साधू संतांनी त्यांचे मूळ काम सोडून हा उद्योग केला. गावोगावी जावून, वारकऱ्यांना भेटून, भोळ्याभाबड्या शेतकरी जनतेची फसवणूक केली. त्यापेक्षाही ज्या जवानांसाठी मी संसदेत आवाज उठवला त्या सैनिकांची पोस्टल मतं मला कमी मिळाली, याची मोठी खंत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetti comment on Minister Sadabhau Khot