Raju Shetti : आंदोलनाची दिशा परिषदेत स्पष्ट करू,ऊस दराबाबत राजू शेट्टी यांचे स्पष्टीकरण

ऊस दराबाबत राजू शेट्टी यांचे स्पष्टीकरण; ‘स्वाभिमानी’ची शनिवारी ऊस परिषद
Raju Shetti
Raju Shettisakal
Updated on

जयसिंगपूर : गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व जादाचा दर या तीन मुद्द्यांवरून यंदाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद शनिवारी (ता. १५) जयसिंगपुरात होत आहे. परिषदेची तयारी पूर्ण झाली असून यात ऊस दराबाबत आंदोलनाची दिशा स्पष्ट करू, असा इशारा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.

शेट्टी म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत. ई-पीक नोंदणी, सातबारा असे सर्व ऑनलाईन असताना राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी तातडीने हे वजन काटे नियंत्रित ठेवण्यासाठी काटे ऑनलाईन करावेत, अन्यथा हंगाम बंद पाडू. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रतिटन मागितले होते. ती अद्याप मिळालेली नाही.

केंद्र सरकारच्या कोणत्याही परवानगीविना शासनाने एफआरपीत दोन तुकडे करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. सध्या बाजारपेठेत साखरेला ३२०० ते ३३०० रुपये दर मिळत आहे, तर दुसरीकडे अनुदानाशिवाय निर्यात झालेल्या साखरेला १५० ते २०० रुपये जादा मिळत आहेत. सरकारने साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी २० ते २५ टक्के इथेनॉल निर्मिती केल्याचा फायदा कारखान्यांना झाला आहे. त्याचबरोबर साखर आयुक्तांनी दोन वर्षांचे रिकव्हरी ऑडिट न केल्याने सध्या मिळणारी एफआरपी ही जुन्या दराची आहे.

राज्यात २०० कारखाने आहेत. त्यांच्या वजनातून १ कोटी ३२ लाख टन ऊस चोरला असून यातून गाळप केलेली साखर ही काळ्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे २२५ कोटी रुपयांचा जीएसटी बुडाला.

वाहतूक मार्गात बदल व पार्किंग व्यवस्था

ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दोनपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने उदगाव गाव-केपीटी-चौंडेश्वरी मार्गे, तर कोल्हापूरहून सांगलीकडे येणारी वाहने तमदलगे, निमशिरगाव बायपासमार्गे उदगांव टोलनाक्यावरून जातील. त्याचबरोबर मराठवाडा, सांगली, सोलापूर येथून येणारी वाहने मादनाईक पेट्रोल पंप, कर्नाटक व सीमाभागातून येणारी वाहने शिरोळ रोडवरील दसरा चौक, कोल्हापूर, सातारा यासह येणाऱ्या वाहनांची सरकारी दवाखाना परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com