स्वाभिमानीतले वादळ पेल्याबाहेर...! 

शेखर जोशी
गुरुवार, 18 मे 2017

सत्ता आणि आंदोलन या दोन तलवारी एका म्यानात बसविण्यासाठी खासदार राजू शेट्टींची गेली तीन वर्षे कसरत सुरू आहे. अर्थात जोपर्यंत सदाभाऊ खोत मंत्री नव्हते तोपर्यंत त्यांनी भाजपशी आदळाआपट करत   संसार केला. पण आता संघटना ऊस दराबाबत पूर्ण बॅकफूटवर गेली आहे. एकाबाजूला साखरेला चांगला दर मिळाला असताना शेतकऱ्यांच्या पदरात मात्र उसाला २८०० पेक्षा अधिक दर ते टाकू शकले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारविरोधात ते बोलतात आणि सदाभाऊ सरकारची बाजू सांभाळतात हे चित्र हास्यास्पद वाटत आहे.

सत्ता आणि आंदोलन या दोन तलवारी एका म्यानात बसविण्यासाठी खासदार राजू शेट्टींची गेली तीन वर्षे कसरत सुरू आहे. अर्थात जोपर्यंत सदाभाऊ खोत मंत्री नव्हते तोपर्यंत त्यांनी भाजपशी आदळाआपट करत   संसार केला. पण आता संघटना ऊस दराबाबत पूर्ण बॅकफूटवर गेली आहे. एकाबाजूला साखरेला चांगला दर मिळाला असताना शेतकऱ्यांच्या पदरात मात्र उसाला २८०० पेक्षा अधिक दर ते टाकू शकले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारविरोधात ते बोलतात आणि सदाभाऊ सरकारची बाजू सांभाळतात हे चित्र हास्यास्पद वाटत आहे. धड सत्ताभोग नाही आणि विरोधाचे  हत्यारही म्यान करावे लागत असल्याने त्यांची  अस्वस्थता वाढत असून त्यातून संघटनेत दुफळी निर्माण झाली आहे. 

सदाभाऊंचे पुत्र सागर भाजपच्या वाटेवर...या बातमीतील उत्तरार्ध इतकाच आहे की शेट्टी-खोत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. संघटनेच्या कर्जमुक्ती यात्रेत सदाभाऊ आजारी असल्याने सहभागी होणार नाहीत,  असे सांगून शेट्टींनी आपल्या मनात काय आहे ते सांगून टाकले आहे. संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना मंत्रिपद सोडावे लागेल, असे याआधीच शेट्टींनी जाहीर केले  आहे. आता तो निर्णय पुढील आठवड्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत येऊ शकतो. त्यामुळेच की काय सागरचा भाजप प्रवेश सदाभाऊंचा त्या बैठकीसाठी स्वतःचा ‘ॲक्‍शन प्लॅन’ सांगणारा असावा. 
शेट्टींची खरी लढाई साखर सम्राटांविरोधातील. विशेषत: राष्ट्रवादी आणि येथील नेते जयंत पाटील त्यांचे येथील नंबर एकचे शत्रू. पण सध्या शेट्टींचे नंबर एकचे टार्गेट सदाभाऊच आहेत. इस्लामपूर सदाभाऊंचे होमग्राऊंड. त्यामुळे इथे बोलताना शेट्टींनी अलीकडे जयंतरावांची कळ काढलेली नाही. जयंत पाटलांच्या ताब्यातील तीस वर्षांची इस्लामपूर पालिकेतील सत्ता उलथवून टाकण्याचे दोघांचेही श्रेय मात्र त्याचा निर्भेळ आनंद मात्र त्यांना  घेता आला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत तर सागर खोत यांच्या उमदेवारीवरून दोघांमधील कलगीतुरा  टिपेला गेला आणि अजूनही त्याचे पडसाद उमटत  आहेत. आता सागरच्या संभाव्य भाजपप्रवेशावर शेट्टींनी   २२ मेच्या आत्मक्‍लेश पदयात्रेनंतर बोलू, असे सांगत दुर्लक्ष केले आहे. अर्थात तरीही कार्यकारिणी बैठकीत  या विषयावर चर्चा अटळ आहे.

शेट्टींनी संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व अधिक महत्त्वाचे ओळखून राजकीय भूमिका निश्‍चित केली आहे. यात सदाभाऊ भाजपवासी झाले तरी ते त्यांच्या भूमिकेला अधिक बळ देणारेच ठरेल. गेल्या तीन वर्षांत शेट्टींची आक्रमकता कमी झाली आहे; ती धार अधिक वाढवणे सोयीचे होऊ शकेल. साखरेला बाजारात ४० रुपये दर स्थिर राहूनही उसाला मात्र प्रती टन २८०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळालेला नाही. ही ऊस पट्टयातील नाराजी ओळखूनच शेट्टींनी सरकारविरोध वाढवत नेला आहे. तर दुसरीकडे सदाभाऊंना मिळालेली सत्ता सुगी शक्‍य तेवढी विनासायास साधायची आहे. त्यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी शेट्टीच विरोध करायचे अशी गुगली जयंत  पाटील नेहमीच टाकायचे. आता या दोघांमधील संघर्षांमुळे ‘जयंतवाणी’चे मतदारसंघात दाखले  दिले जात आहेत. दुसरीकडे त्यांच्या या सत्ताविरोधाच्या भूमिकेमुळे आम्ही काय फक्त काठ्याच खायच्या का असा काही लाभार्थींचा सूर आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचा कैवार घेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे संघर्ष यात्रा काढून, बच्चू कडू यांनी आसूड यात्रा काढून शेतकऱ्यांची सहानभूती घेत आहेत. त्यातून ऊस पट्टयातील विरोधकाची स्पेस
जायची स्वाभिमानीला भीती आहे. त्यामुळेच शेट्टींची आत्मक्‍लेश यात्रा भाजपला मदत केल्याबद्दलने आलेल्या पश्‍चातापाबद्दलची आत्मक्‍लेश यात्रा ठरण्याचीच शक्‍यता अधिक आहे. सध्या तरी शेट्टींना आत्मक्‍लेशाशिवाय हाती काही राहिलेली नाही. भाजपने स्वाभिमानीच्या शिडातील हवा कमी कशी केली जाईल याचीही खबरदारी घेतलेली दिसते. यदाकदाचित सदाभाऊ भाजपमध्ये गेलेच तर शेट्टींना आता शिवसेनेशी दोस्ती वाढवून आपली वाट चालवी लागेल असे चित्र आहे. त्याचे संकेतही शेट्टींनी शिवसेनेच्या मेळाव्यातील संभाव्य उपस्थितीतून दिले आहेत. दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. त्यात सदाभाऊंचा रस्ता निश्‍चित झाला आहे; शेट्टींचीही लवकरच होईल ! 

मांडलिक म्हणूनच या..!
गेल्या तीन वर्षांत भाजपने शेट्टींना राज्यात आणि  केंद्रातही फारसे जमेत धरलेले नाही. दिल्लीतही शेट्टींनी मोदी सरकारला सभागृहात कोंडीत पकडल्याचे दिसलेले नाही. दिल्लीपेक्षा ते राज्यातील आंदोलन आणि राजकारणातच अधिक रमले आहेत. म्हणून फडणवीस सरकारवर त्यांचा काही दबाव किंवा प्रभाव पडल्याचेही दिसलेले नाही. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात शेट्टींना फारसे महत्त्वच
दिलेले नाही. त्यांच्या सब कुछ कमळ या नाऱ्यात संघटनेचाच अडसर ठरतो त्यामुळे शेट्टींनी सत्तेच्या मांडवात यायचे तर मांडलीक म्हणूनच यावे असा एकूणच भाजपचा पवित्रा आहे. त्यामुळे शेट्टींचा सरकार विरोधी सूर अधिक तीव्र होत गेला. त्याचवेळी सत्तेची ऊब मिळाल्याने सदाभाऊ मात्र सरकारचे प्रवक्ते बनत गेले.

Web Title: raju shetty sadhabhau khot