वडिलांनी दिले... चोराने नेले अन्‌ नगरसेवकाने तारले

सोलापूर - दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या राकेश बागले यास बुधवारी नवीन रेंजर सायकल देताना नगरसेवक आनंद चंदनशिवे.
सोलापूर - दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या राकेश बागले यास बुधवारी नवीन रेंजर सायकल देताना नगरसेवक आनंद चंदनशिवे.

सोलापूर - दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या आपल्या मुलास वडिलाने आनंदाने नवीन रेंजर सायकल भेट दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी मुलगा सेतू कार्यालयात गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. ही घटना कळाल्यावर बसपचे नगरसेवक त्या गुणवंताच्या मदतीला धावले आणि त्यांनी रेंजर सायकल त्याला सत्कार करून भेट दिली. रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम प्रशालेतील राकेश राहुल बागले या विद्यार्थ्याची ही चित्तरकथा. वडिलांनी दिले... चोराने नेले अन्‌ नगरसेवकाने तारले, असाच काहीसा अनुभव राकेशला आला. 

राहुलचा जन्मच मुळात स्मशानभूमीतला. त्यामुळे स्मशानाची भीती नाही. अमावस्या असो वा पौर्णिमा. काही फरक नाही. मध्यरात्री बारा-साडेबारापर्यंत स्मशानभूमीतल्या हिरवळीवर अभ्यास. सोबतीला सवंगडीही. अशा स्थितीत राकेशने ७९.२० टक्के गुण घेत उल्लेखनीय यश मिळवलेच, शिवाय शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. 

वडील महापालिकेत मजूर म्हणून कार्यरत, आई गृहिणी. आजोबा कारंबा स्मशानभूमीचे राखणदार होते. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरातच राकेशचा जन्म झालेला. स्मशानभूमीत दिवसा जाण्यास लोक घाबरतात. पण, राकेशने रात्री-मध्यरात्रीपर्यंत याच स्मशानभूमीत अभ्यास केला. मित्र स्मशानभूमीत अभ्यास करतोय म्हटल्यावर वर्गातील सहकारीही आले आणि त्यांनी जोमाने अभ्यास केला. या स्मशानभूमीत अभ्यास केलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. 

राकेश दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी त्यास रेंजर सायकल घेऊन दिली. जातीचा दाखला काढण्यासाठी राकेश जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. त्या ठिकाणी सायकल चोरीला गेली. नवीन सायकल चोरीला गेल्याने राकेश घाबरला, पण वडिलांनी त्याची समजूत काढली. पण, एकदम साडेचार हजार रुपयांची सायकल घेणे लगेच शक्‍य नाही, असेही सांगितले. ही घटना बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना समजली. त्यांनी राकेशला कार्यालयात बोलावून घेतले आणि हरविलेल्या सायकलप्रमाणेच नवीन सायकल घेऊन दिली. त्या वेळी राकेशने आनंदाश्रू ढाळून आनंद व्यक्त केला. 

बहिणींनीही केला संकल्प
राकेशने आता शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आहे. घरची गरिबी असली तरी मुलाची सर्व इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प त्याचे वडील राहुल बागले यांनी केला आहे. प्रतिकूल स्थितीत भावाने मिळवलेले यश पाहून राकेशच्या तिन्ही बहिणीही आनंदून गेल्या आहेत. आपणही दहावीच्या परीक्षेत असेच यश मिळवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com