ग्रामरक्षक दलासाठी नऊ सदस्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

राळेगणसिद्धी - ग्रामरक्षक दलासाठी नऊ सदस्यांची निवड आजच्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आली. या सदस्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यात स्थापन होणारे हे पहिले ग्रामरक्षक दल असेल.

राळेगणसिद्धी - ग्रामरक्षक दलासाठी नऊ सदस्यांची निवड आजच्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आली. या सदस्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यात स्थापन होणारे हे पहिले ग्रामरक्षक दल असेल.

सरपंच रोहिणी गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे उपस्थित होते. माजी सरपंच मंगल मापारी यांनी ग्रामरक्षक दलाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर हिराबाई नवले, कौशल्या हजारे, माधुरी पठारे, रतन पोटे, शकुंतला औटी, सुरेश राजाराम पठारे, भीमराव पोटे, संदीप पठारे व बाळासाहेब पठारे या नऊ सदस्यांची निवड करण्यात आली.

हजारे म्हणाले, '"ग्रामरक्षक दलाचा कायदा सामाजिक बदल घडविणारा आहे. माहिती अधिकाराप्रमाणे देशातील इतर राज्यांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे वाटते.

ग्रामरक्षक दलास अनेक अधिकार आहेत. गावात अवैध धंदे दिसल्यास त्याचा पंचनामा करून पोलिसांना कळविले पाहिजे. सदस्यांनी पदाचा गैरवापर करू नये. तसे आढळल्यास सदस्यत्व काढून घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. राळेगणसिद्धी परिवाराने तालुक्‍यातील प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी जागृती करावी.''

शेतकरी संपाला पाठिंबा देण्याचा उपसरपंच लाभेश औटी यांनी मांडलेला ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. शेतकरी व सरकारमध्ये मध्यस्थी करण्याच्या हजारे यांच्या पत्राचा विपर्यास करणाऱ्यांचा ग्रामसभेने निषेध केला.

...तर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 15 तारखेला ग्रामरक्षक दल स्थापनेचा कार्यक्रम होणार आहे. शेतकऱ्यांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्यास हा कार्यक्रम रद्द करण्यात येईल, असे ग्रामसभेत जाहीर करण्यात आले.

Web Title: ralegansiddhi news nine member selected for rural security team