घरकुलांच्या मागणीसाठी "आयटक'चा पालिकेवर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

इचलकरंजी - यंत्रमाग उद्योगातील कामगारांना घरकुले देण्याच्या मागणीसाठी आज आयटकने पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शने करून नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन दिले. याबाबत मार्ग काढण्यासाठी उद्या (ता. 24) सकाळी 11 वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे. 

इचलकरंजी - यंत्रमाग उद्योगातील कामगारांना घरकुले देण्याच्या मागणीसाठी आज आयटकने पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शने करून नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन दिले. याबाबत मार्ग काढण्यासाठी उद्या (ता. 24) सकाळी 11 वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने यंत्रमाग उद्योगातील कामगारांना घरकुले देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पालिकेने या योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी यापूर्वी आयटकप्रणित करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून घरकुल मागणीचे 4750 अर्ज पालिकेकडे सादर केले; मात्र त्याबाबत पालिकेने कोणतीच पुढे कार्यवाही केली नाही. त्यामुळे याबाबतचा जाब विचारण्यासाठी पुन्हा आज आज पालिकेवर मोर्चा काढला. 

गोकुळ चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला. स्टेशन रोडवरून घोषणा देत पालिकेवर मोर्चा आला. प्रवेशद्वारात पोलिसांनी तो रोखला. त्यानंतर मोर्चेधारकांनी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी मोर्चेधारकांचे निवेदन स्वीकारून प्रत्येक कामगाराला घरकुल मिळवून देण्यासाठी आपण बांधील असल्याचे स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, नगरसेवक सागर चाळके, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, प्रशासन अधिकारी निवृत्ती गवळी, शाखा अभियंता सुभाष देशपांडे यांनी चर्चेत भाग घेतला. 

मोर्चाचे नेतृत्व नामदेव गावडे, हणमंत लोहार, मारुती आजगेकर, शंकर आडावकर, रामचंद्र सौंदत्ते, अशोक गोपलकर, ज्ञानदेव महादार, बंडोपंत सातपुते, नजमा दुरुगवाले, वहिदा मुजावर यांनी केले. या वेळी शिवाजीनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. 

घरकुलांबाबत संभ्रमावस्था 
केंद्र शासनाने बेघरांना पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी येथील पालिकेतर्फे सुरू आहे, तर मोर्चेधारकांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या निर्णयानुसार घरकुलांची मागणी केली आहे. त्यामुळे घरकुले कोणत्या योजनेतून देता येतील, याबाबत संभ्रमावस्था आहे.

Web Title: Rally on Corporation for Gharkul Demand