राम शिंदेंमध्ये मुख्यमंत्र्यांची मिजास; रोहित पवारांची टीका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कर्जत-जामखेड ‘राष्ट्रवादी’कडेच येईल
‘कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ जागावाटपात ‘राष्ट्रवादी’कडे येईल. जागावाटप झाल्यानंतर आघाडीतील सर्व स्थानिक कार्यकर्ते एकजुटीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील,’’ असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

नगर - ‘कर्जत-जामखेड मतदारसंघात स्वतःचे फलक लावून फक्त बडेजाव मिरवणाऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा कारभार नियोजनशून्य आहे. दुष्काळासारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर त्यांचे परिसरातील परिस्थितीकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी याबाबत किती बैठका घेतल्या? पालकमंत्री राम शिंदे यांना मुख्यमंत्रीच झाल्यासारखे वाटते,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी लगावला.

पवार यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. कर्जत तालुक्‍यातील चाराछावण्यांचे प्रलंबित प्रश्‍न आणि पाण्याच्या नियोजनाबाबत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवेदनात म्हटले आहे, की कर्जत व जामखेडमध्ये दुष्काळामुळे मुबलक चारा व पाणी पशुधनाला मिळत नाही. कर्जतमध्ये ४० चाराछावण्या बंद आहेत. छावणीचालकांच्या बिलाच्यादेखील अडचणी आहेत. काही चालकांना अद्याप बिले मिळाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. त्याची झळ पशुधनाला बसत आहे. त्यामुळे छावणीचालकांचे देय अनुदान त्वरित अदा करावे. कुकडी कालव्याचे नियोजन करीत असताना भेदभाव न करता प्रत्येकाला समान न्याय देऊन पाणीपुरवठा करावा, सीना नदीवरील प्रकल्पात वंचित राहिलेल्या गावांसाठी काही तरी योजना मार्गी लावावी.

विकासासाठी ‘रोहित पॅटर्न’
‘‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे. परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई योजना मार्गी लावताना चारी पद्धतीने असलेली जुनी योजना मार्गी लावणार आहे,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले. 

दबावतंत्रातून हेकेखोरीचे राजकारण
‘‘काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चे विद्यमान अनेक आमदार भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. तथ्य असल्याशिवाय पवारसाहेब बोलत नाही. जे जात आहेत, त्यांच्या हेतूविषयी आपण बोलणार नाही; मात्र यामागे राजकीय दबावतंत्रातून हेकेखोरीचे राजकारण होत आहे,’’ असा आरोप रोहित पवार यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Shinde Chief Minister Rohit Pawar Politics