शेट्टींनी मोदींना सोडून चूक केली - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

इस्लामपूर - मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी मोदींना सोडून चूक केली. सर्वच शेतकरी शेट्टींच्या सोबत नाहीत, सदाभाऊंच्याही मागे आहेत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

इस्लामपूर - मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी मोदींना सोडून चूक केली. सर्वच शेतकरी शेट्टींच्या सोबत नाहीत, सदाभाऊंच्याही मागे आहेत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आरपीआयचे राज्य सचिव अरुण कांबळे यांचा पुतण्या साकेत याच्या खुनाच्या प्रकारानंतर ते कांबळे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी येथे आले होते. या खुनाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारने बाबासाहेबांची घटना जपण्याचे आणि दलितांच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देशातील दलितबांधव त्यांच्यासोबत राहतील. या निवडणुकीतही आम्ही भाजपसोबतच जाणार आहोत.

- रामदास आठवले

ते म्हणाले, ‘तीन राज्यात भाजप हरली असली तरी काँग्रेसने फार मोठ्या फरकाने बहुमत मिळविलेले नाही. विरोधकांमध्ये एकी नाही. २०१९ च्या निवडणुकीत मोदींचीच सत्ता येईल. 
विरोधक अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. या पराभवामुळे आम्ही गंभीर झालो आहोत. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. कर्जमाफी, इंधन भाववाढ रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.’

ते म्हणाले, ‘राज्यात भाजप शिवसेनेने एकत्रच राहायला हवे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटप करताना ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे ठरवून घ्यावे. किंवा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री याबाबत चर्चेतून निर्णय घ्यावा. आरपीआयला लोकसभेच्या किमान २ जागा मिळाव्यात. राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांच्याबाबत मी मध्यस्थी करणार आहे. सध्या शेट्टी गेले तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणून सदाभाऊ आमच्यासोबत आहेत. ईव्हीएम हवे की नको यावर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. तरीही या निवडणुकीत ते अशक्‍य आहे. न्यायालयाने राफेल बाबत क्‍लीनचिट दिलीय, पण विरोधकांच्याकडे दुसरा मुद्दा नसल्याने त्यांचे आरोप सुरूच आहेत. आम्ही येत्या चार महिन्यात सर्व हवा बदलून टाकू. त्यामुळे २०१९ ला पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येईल.’

 

Web Title: Ramdas Athavale comment