आवाडेंच्या मनधरणीसाठी पक्षनिरीक्षक कोल्हापुरात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीसाठी पक्षाचे निरीक्षक रमेश बागवे आज कोल्हापुरात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी हॉटेल सयाजी येथे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन दीर्घकाळ चर्चा केली. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीसाठी पक्षाचे निरीक्षक रमेश बागवे आज कोल्हापुरात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी हॉटेल सयाजी येथे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन दीर्घकाळ चर्चा केली. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून पी. एन. यांचे पुत्र राहुल पाटील यांचे नाव निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका यांची उमेदवारी असणार आहे. दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या मदतीने सावध हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्याला किती सदस्यांचा पाठिंबा हे सांगण्यापेक्षा अध्यक्ष आमचाच होईल, एवढेच दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जाते. 

हातकणंगले तालुक्‍यातील दोन मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी स्थानिक आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले. हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. या दोन सदस्यांचा पाठिंबा अध्यक्ष निवडीत निर्णायक ठरणार आहे. पण आवाडे - पी. एन. यांच्यात गेल्या काही वर्षांपासून धुमसत असलेल्या वादामुळे हे दोन सदस्य कोणाबरोबर जाणार याविषयी संभ्रमावस्था आहे. आवाडे पक्षासोबत येण्याची चिन्हे नाहीत, म्हटल्यावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून श्री. आवाडे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार श्री. बागवे कोल्हापुरात आले. त्यांनी श्री. आवाडे यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. या वेळी प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी होते. त्यानंतर श्री. बागवे यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंग देसाई यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेचा अहवाल ते तातडीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सादर करणार आहेत. 

आवाडेंनी व्यथा मांडली - बागवे 
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्याशी चर्चेत आपली व्यथा मांडली. ते इतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत. त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्याचबरोबर पी. एन. पाटील, सतेज पाटील, बजरंग देसाई यांच्याशी चर्चा करून त्याचा अहवाल तातडीने प्रदेशाध्यक्षांना पाठवून त्यांचे मत घेतले जाईल, असे पक्षाचे निरीक्षक रमेश बागवे यांनी सांगितले. 

सत्तेसोबत जाणार : व्ही. बी. पाटील 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्नुषा रसिका पाटील या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे कोणासोबत जायचे हा निर्णय आमचा राहील. आम्ही कुणाशीही बांधिल नाही. सत्ता कोणाची त्यांच्यासोबत आम्ही असू, अशी प्रतिक्रिया उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

सेना आमदारांची कॉंग्रेस नेत्यांबरोबर बैठक 
दरम्यान, सायंकाळी सेनेचे आमदार सत्यजित पाटील, प्रकाश आबिटकर व उल्हास पाटील यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. सेनेच्या तीन आमदारांचे पाच सदस्य आहेत, हे पाचही सदस्य कॉंग्रेस आघाडीसोबत राहतील, असे आश्‍वासन या बैठकीत दिल्याचे समजते. 

Web Title: ramesh bagwe in kolhapur