लढवय्ये कामगार नेते रमेश देसाई यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कोल्हापूर - महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष आणि लढवय्ये कामगार नेते रमेश देसाई (80, रा. शिवाजी पेठ) यांचे आज सकाळी निधन झाले. महापालिका कामगार संघटना आणि देसाई असे एक समिकरणच महापालिकेत गेल्या चाळीस वर्षापासून तयार झाले होते. 

कोल्हापूर - महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष आणि लढवय्ये कामगार नेते रमेश देसाई (80, रा. शिवाजी पेठ) यांचे आज सकाळी निधन झाले. महापालिका कामगार संघटना आणि देसाई असे एक समिकरणच महापालिकेत गेल्या चाळीस वर्षापासून तयार झाले होते. 

रमेश देसाई हे लिपिक म्हणून महापालिकेत नोकरीस लागले होते. अगदी सुरवातीपासूनच ते कामगार संघटनेत सक्रिय होते. राम घोरपडे अध्यक्ष असताना रमेश देसाई हे सचिव म्हणून काम पहात होते. संघटनेतही संघर्ष करुन त्यांनी कामगार संघटना आपल्या ताब्यात घेतली. कामगार संघटनेवर त्यांनी स्वताचे वर्चस्व निर्माण केले.

1977 ला अध्यक्ष होते. ते आजही या पदावर कायम होते. तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणाशीही संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. त्यामुळे अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यातही अडकले. मात्र संघर्ष करण्याच्या वृत्तीमुळे ते शेवटपर्यंत कधी हार मानायचे नाहीत. कामगारांचे हित पाहताना महापालिकेचेही हित जपण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आहे.

महापालिकेत त्यांनी घरफाळा विभागातही काम केले आहे. अधिक्षकपदापर्यंत जाउन ते सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी महापालिका आणि कर्मचारी संघटनेशी नाळ कधीच तुटू दिली नाही. अखेरपर्यंत ते महापालिका कर्मचाऱ्यासाठी काम करत होते. गेल्या कांही वर्षापासून जुर्जर आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते.उपचार सुरु असतानाच शुक्रवारी (ता.12) त्यांचे निधन झाले.

दुपारी एक वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला शिवाजी पेठ येथील त्यांच्या राहत्या घरापासून सुरवात झाली. महापालिकेत अंत्ययात्रा आल्यानंतर महापौर माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह सर्वच पदाधिकारी,नगरसेवक, कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करुन देसाई यांन अखेरचा निरोप दिला. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Desai no more