Vidhan Sabha 2019 रामराजे निंबाळकरांचा आज फैसला ?

Vidhan Sabha 2019 रामराजे निंबाळकरांचा आज फैसला ?

फलटण शहर : आम्ही शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहू, असा शब्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्यानंतर उद्या (ता. 30) पहिल्यांदा फलटणमध्ये राजे गटाचा युवा संवाद मेळावा होत आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय झाल्यापासून फलटणच्या राजे गटामध्ये अस्वस्थता आहे. या निवडणुकीनंतर विरोधी कार्यकर्त्यांना फलटण तालुक्‍यात पाठबळ मिळत आहे. त्यातूनच फलटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. या पार्श्‍वभूमीवर रामराजे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत जोर चढला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये झालेल्या राजे गटाच्या मेळाव्यात "शरद पवार हे आमचे दैवत आहेत, परंतु, मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागेल,' असे रामराजेंनी म्हटले होते. त्यामुळे राजे गटाचा काय निर्णय होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सातारा दौरा झाला. या दौऱ्याच्या नियोजनात राजे गटाचे प्रतिनिधित्व नव्हते. परंतु, सभास्थळी संजीवराजे व आमदार दीपक चव्हाण यांनी हजेरी लावली. त्या वेळी संजीवराजेंनी ठाम भूमिका मांडत राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजे गटाचा निर्णय काय असणार, हे समोर आले होते. परंतु, रामराजे अद्याप त्याबाबत ठाम बोललेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला पाच दिवस राहिले आहेत. तरीही पक्षाचा निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बहुतांश कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत राहावे, असाच सूर आहे. याच पार्श्‍वभूमीवर फलटणमध्ये राजे गटाच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये रामराजे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.
 


रामराजेंच्या भूमिकेविषयी उत्सुकता... 
 रामराजे राष्ट्रवादी सोडणार की, पक्ष बदलणार ? 
 पक्ष बदलला तर तो कोणता असेल ? 
 का अपक्ष उमेदवार मैदानात उतरवणार ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com