निंबाळकरांची जीभ घसरली; उदयनराजेंची 'चक्रम' अशी तुलना

निंबाळकरांची जीभ घसरली; उदयनराजेंची 'चक्रम' अशी तुलना

फलटण ः सातारा जिल्ह्यात जोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे ही चक्रम माणसे आहेत, तोपर्यंत माझी भूमिका कठोर राहील, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली.

उदयनराजे भोसले यांना पक्षात सांभाळायचे असेल, तर त्यांना कंट्रोल करा; अन्यथा आम्हाला पक्षातून बाहेर पडायची परवानगी द्या, असे सांगत रामराजे यांनी एकप्रकारे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाचा इशारा दिला आहे. 

नीरा-देवधर प्रकल्पातून बारामतीला दिले जाणारे अतिरिक्त पाणी रोखल्यानंतर काल खासदार उदयनराजे भोसले आणि कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत रामराजेंवर खरपूस टीका केली होती. त्याच्या आदल्याच दिवशी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी फलटणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामराजेंवर आरोप केले होते. सातारा जिल्ह्यातील पाणी बारामतीला देण्यामागे रामराजे यांचाच हात होता, असे सांगत या तिघांनीही आपले परंपरागत विरोधक असलेल्या रामराजेंना याकामी दोषी धरले होते. 

आज फलटण येथे घेतलेल्या एका मेळाव्यात आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रामराजे यांनी या तिघांनाही सडेतोड उत्तर दिले. उदयनराजेंचे नाव न घेता ते म्हणाले, ""मी जसा स्वयंभू भगिरथ आहात, तसेच तुम्हीही स्वयंभू छत्रपती आहात, हे लक्षात ठेवा. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावलेली आहे. त्यात आपण त्यांना निक्षून सागणार आहोत, की तुमच्या खासदाराला आवरा; अन्यथा आम्हाला बाहेरचे दरवाजे मोकळे करा.''

खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका रामराजे आणि काही आमदारांनी घेतली होती. मात्र, पक्षाध्यक्ष पवार यांनी सगळ्यांची समजूत काढत उदयनराजे यांनाच उमेदवारी दिली होती. नीरा-देवधरच्या पाण्याच्या मुद्‌द्‌यावरून आता पुन्हा या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com