"महानंदा'च्या अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

महाराष्ट्रातील सर्व सहकारी दुध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दुध संघाच्या संचालक पदावर, राज्यातील दुध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्वांची निवड होते.

संगमनेर : संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंदा) संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 
महाराष्ट्रातील सर्व सहकारी दुध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दुध संघाच्या संचालक पदावर, राज्यातील दुध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्वांची निवड होते. यावर्षी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांमधील विविध नेते स्पर्धेत होते. 

अवश्‍य वाचा-  बघा, त्याने ड्युटीसाठी बॉसचा मर्डर केला 

विविध योजना राबविल्या 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार व राज्यातील इतर नेत्यांनी दुरदृष्टीने ही निवड बिनविरोध केली. मागील 15 वर्षांपासून दुध संघाचे संचालक म्हणून काम करताना, त्यांनी दुग्ध व्यवसायात आधुनिकतेची कास धरीत, दुधवाढ योजना राबवली. मॉर्डन डेअरी फार्म, गाय पोळा, गायींसाठी आरोग्य शिबिरे, चारा व्यवस्थापन व स्वच्छता असे

विविध उपक्रम राबविले. 
राजहंस दुधासह विविध उपपदार्थांचे दर्जेदार उत्पादन व विक्री यातून संघाचा लौकीक वाढविला आहे. या संघामुळे संगमनेरची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. शेतकऱ्यांना विश्‍वासाचा जोड धंदा मिळाला आहे. रणजितसिंह देशमुख यांची महानंदा संस्थेच्या अध्यक्षपदी झाल्याने संगमनेर तालुक्‍याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 

संगमनेरात अभिनंदन 
या निवडीबद्दल तालुक्‍यातील दुध उत्पादकांसह महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, ऍड. माधवराव कानवडे, सत्यजित तांबे, शरयु देशमुख, डॉ. प्रतापराव उबाळे, व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranjit Singh Deshmukh as president of Mahananda