सिनेसृष्टीत बलात्कार झाला तरी ती भाकरी देते - सरोज खान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

सांगली - 'कास्टिंग काऊचसारख्या गोष्टींवरून चित्रपटसृष्टी बदनाम होत आहे. ज्या महिलेकडे कला, गुणवत्ता आहे, तिने ठरविले तर अशा गोष्टींना ती प्रतिकार करू शकते. महिलांवरील अशा प्रसंगाच्या व्यथा या बाबा आदमच्या जमान्यापासून सुरूच आहेत. त्यामुळे महिला कलाकारांनी याबाबत ठामपणाने मुकाबला केला पाहिजे,'' असे मत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. मात्र, आपल्या विधानावरून वाद उत्पन्न होतो आहे, असे वाटताच त्यांनी आज माध्यमांशी बोलताना आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्‍त केली.

एका संस्थेने आयोजित केलेल्या नृत्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी त्या सांगलीत आल्या आहेत. कास्टिंग काउचच्या घटनांमुळे बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाचे जळजळीत वास्तव उघड झाले आहे. "कास्टिंग काउच'ची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. या प्रश्‍नावर सरोज खान यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या,""कास्टिंग काउच'चे प्रकार होणे ही नवीन बाब नाही. हे बाबा आदमच्या जमान्यापासून आहे. सरकारी यंत्रणेतही महिलांचे लैंगिक शोषण होत असते, तेथे त्यांना रोजगारही मिळत नाही; पण बलात्कार करून फिल्म इंडस्ट्री कोणाला रस्त्यावर सोडून देत नाही तर त्या बदल्यात भाकरी तरी देते. मात्र, "कास्टिंग काउच'च्या अशा मागण्यांना बळी पडायचे की नाही, हे संबंधित कलाकारांनी ठरवायचे आहे.'' आपली कला जर चांगली असेल तर कोणापुढे शरण जायचे काही कारण नाही, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Rape Case Casting Couch Saroj Khan Statement About Casting Couch In Film Industry