'रिपाइं'च्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

सातारा - येथील परिसरातील सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा - येथील परिसरातील सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मधुकर महादेव आठवले (वय 58, रा. संविधान बंगला, शाहूपुरी) याला अटक करण्यात आली आहे. तो "रिपाइं'चा जिल्हा सरचिटणीस आहे. आठवले ड्रायव्हिंग स्कूल या नावानेही तो व्यवसाय करतो. शाहूपुरीत किराणा मालाचे त्याचे दुकानही आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. 30) सायंकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षांची मुलगी काही साहित्य देण्यासाठी आठवले याच्या घरी गेली होती. या वेळी त्याची पत्नी घरात नव्हती. वस्तू घेतल्यानंतर त्याने आत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या वेळी मुलीने आरडाओरडा केला. "मी आई-वडिलांना सांगेन' असे ती मुलगी त्याला म्हणाली. या वेळी त्याने संबंधित मुलीला आईवर केस टाकण्याची, तसेच वडिलांना कामावरून काढण्याची धमकी दिला. या दरम्यान तो बाथरूममध्ये गेल्यावर मुलीने त्याच्या घरातून पळ काढला.

ही घटना तिच्या भावाला समजली होती. मात्र, मुलगी घरी आल्यानंतर आईने दोघांना लगेचच एका कार्यक्रमासाठी नातेवाइकांच्या घरी नेले. तेथे कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या मुलाने महत्त्वाचे सांगायचे आहे, असे म्हणत आईला लगेच घरी निघण्याचा तगादा लावला. त्यामुळे ते घरी आले. त्या वेळी आठवले याने बहिणीशी केलेला प्रकार त्याने आईला सांगितला.

याबाबत आईने मुलीला विचारणा केली. तेव्हा ती रडायला लागली. आईने विश्‍वासात घेतल्यावर तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांना बोलावून सर्व जण तक्रार देण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात संतप्त नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार आठवले याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: rape on girl