नगरची चेरापुंजी रतनवाडीच.... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

 नगर जिल्ह्याची चेरापुंजी तालुक्‍यातील रतनवाडी असल्याचे यंदाच्या पावसाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यंदा जूनपासून गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील सर्वाधिक 7210 मिलिमीटर पाऊस रतनवाडी येथे झाल्याचे दिसते. 

अकोले : नगर जिल्ह्याची चेरापुंजी तालुक्‍यातील रतनवाडी असल्याचे यंदाच्या पावसाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यंदा जूनपासून गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील सर्वाधिक 7210 मिलिमीटर पाऊस रतनवाडी येथे झाल्याचे दिसते. 

त्या खालोखाल घाटघर येथे सात हजार 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा दमदार पाऊस झाल्याने तालुक्‍यातील छोटे प्रकल्प, बंधारे, तलाव यांसह भंडारदरा, तसेच निळवंडे धरण तुडुंब भरले. तालुक्‍यात सरासरी 1545 मिलिमीटर पाऊस झाला. 

निसर्गाचे वरदान 
 

नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारा व निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका म्हणजे अकोले. येथील डोंगरमाथ्यावर पावसाळ्यात धो-धो पाऊस पडतो, तर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू असतात, अशी विरोधाभासी स्थिती असते. घाटमाथ्यावरील रतनवाडी, घाटघर, साम्रद, उडदावणे, पांजरे, तसेच हरिश्‍चंद्रगड, पाचनई, शेणित आदी भागांत यंदाही मुसळधार जलधारा कोसळल्या. मात्र, घाटमाथ्यावरील पावसाचे बहुतांश पाणी कोकणात वाहून जाते. 

परतीच्या पावसाने नुकसान 

गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते; मात्र यंदाच्या पावसाळ्यात सगळी कसर भरून निघाली. अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. "बस बाबा, आता नको पडू..' असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली. त्यात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील पिकांचे अतोनात नुकसानही झाले. अर्थात, त्याचे पंचनामे झाले असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. 

जूनपासून झालेल्या पावसाची 
आकडेवारी (मिलिमीटरमध्ये) 

भंडारदरा - 5134 
घाटघर - 7066 
रतनवाडी - 7210 
पांजरे - 5274 
वाकी - 4204 

धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट) 
भंडारदरा : 11039 
निळवंडे : 8320 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratanwadi, the Cherrapunji of the nagar district