मिरज रेल्वे स्थानकात हातगाड्यावरुन वृद्ध रुग्णाचा प्रवास

संतोष भिसे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

 मिरज - येथील रेल्वे जंक्शनवर रुग्णांसाठी पुरेशा संख्येने  चाकाच्या खुर्च्या उपलब्ध नसल्याने रुग्णांना हमालांनी हातगाड्यावरुन ढकलत नेल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रवासी संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

 मिरज - येथील रेल्वे जंक्शनवर रुग्णांसाठी पुरेशा संख्येने  चाकाच्या खुर्च्या उपलब्ध नसल्याने रुग्णांना हमालांनी हातगाड्यावरुन ढकलत नेल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रवासी संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

मिरज स्थानकात रुग्णांना हलगर्जीपणाची वागणूक मिळत असल्याचे अनुभव सातत्याने येतात. असाच एक प्रकार दोन दिवसांपुर्वी घडला. इचलकरंजी येथील एका वृद्ध रुग्ण महिलेला उपचारांसाठी म्हैसूरला नेण्याची शिफारस डॉक्टरांनी केली होती. नातेवाईकांनी तिला रुग्णवाहीकेतून मिरजेपर्यंत आणले.

दुपारी साडेतीन वाजण्याच्या कोल्हापूर - बंगळूर राणी चन्नम्मा एक्सप्रेसमधून न्यायचे होते. वृद्धेला चालता येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी चाकाच्या खुर्चीचा शोध सुरु केला. स्थानकात रुग्णांसाठी खुर्च्यांची सोय आहे, पण त्यातील एक नादुरुस्त आहे. दुसरी खुर्ची अन्य एका रुग्णासाठी वापरात असल्याचे स्थानक अधिकाऱ्यांनी सांगितले.  पर्यायी अन्य व्यवस्था करण्यास असमर्थता दर्शवली. नातेवाईकांनी साधी प्लास्टीकची खुर्ची दिल्यास त्यातून उचलून नेण्याची तयारीही दर्शवली, पण अधिकाऱ्यांनी त्यालाही नकार दिला.

एक्सप्रेस तिसऱ्या क्रमांकाच्या प्लँटफार्मवर येणार होती. हैराण झालेल्या नातेवाईकांनी एक्सप्रेस पहिल्या प्लँटफार्मवर घेण्याची विनंती केली, तरीही अधिकाऱ्यांची नकारघंटा कायम होती. गाडीची वेळ जवळ येत असल्याने नातेवाईकांची त्रेधा उडाली. ते पाहून हमाल मदतीला धावले. रुग्णवाहीका स्थानकाच्या उत्तरेकडील टोकाला नेली. तेथे प्लँटफार्म संपतो व उतार सुरु होतो. हमालांच्या मदतीने वृद्धेला उतरवून घेतले. हमालांच्या   ढकलगाडीवर झोपवले. गाडी ढकलत तिसऱ्या प्लँटफार्मवर नेली. तोपर्यंत एक्सप्रेसने स्थानकात प्रवेश केला होता. हमालांच्या मदतीनेच वृद्धेला स्लिपर बोगीत बसवले.  

स्थानकातील गैरव्यवस्थेबद्दल नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्यपंढरी असणाऱ्या मिरजेत दररोज शेकडो रुग्ण रेल्वेने येतात. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून लोक येत असतात, पण त्यांच्या सोयींकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. जंक्शनमध्ये रेल्वेचा दवाखाना, डॉक्टर, रुग्णवाहीका अशा सोयी आहेत, पण रुग्णांसाठी त्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. गेल्याच महिन्यात एक महिला रेल्वेच्या जनरल बोगीत प्रसूत झाली, त्यावेळीही वैद्यकीय मदत मिळाली नव्हती. एक्सप्रेसमध्ये ह्रद्यविकाराचा त्रास होत असणारे प्रवासी नेहमी मिरजेत उतरतात, पण त्यांनाही तातडीची वैद्यकीय मदत मिळत नाही. 

लाजीरवाणी बाब - संदीप शिंदे
रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, पुण्यानंतरचे सर्वात मोठे जंक्शन असणाऱ्या मिरज स्थानकात ही अनागोंदी लाजीरवाणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावार कठोर कारवाई केली पाहीजे.

Web Title: Ratnagiri News no facility for aged patient on Miraj Rail Station