यूथ बॅंकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

यूथ बॅंकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध

कोल्हापूर - येथील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील थकीत कर्जामुळे बॅंक एनपीएमध्ये गेली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. निर्बंधांमुळे आता बॅंकेकडून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये देता येणार नाहीत. तसेच कर्ज द्यायचे नाही आणि घ्यायचे नाही? अशा अटी घातल्याचे समजते. याबाबतचे पत्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह इतरांना आल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. 

यूथ बॅंकेची थकबाकी वाढल्यामुळे ही बॅंक एनपीएमध्ये गेली आहे. परिणामी बॅंकेची आर्थिक स्थिती अधिक कमकुवत होऊ नये म्हणून आरबीआयकडून अशा पद्धतीची नोटीस पाठवल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. 

आरबीआयकडून सर्व सहकारी बॅंकांवर नजर ठेवली जात आहे. यामध्ये बॅंकांची थकबाकी पंधरा टक्‍क्‍यांहून अधिक असेल, तर त्यांच्यावर आरबीआयकडून आर्थिक निर्बंध घातले जातात. असे निर्बंध घातल्यानंतर तेथून पुढे बॅंकेने कोणतेही कर्ज घ्यायचे नाही आणि कोणालाही कर्ज द्यायचे नाही, असे निर्देश असतात. यामुळे बॅंकेच्या व्यवहारावर मर्यादा येतात. तसेच सभासदांना सभासदांनाही पाच हजार रुपयांपेक्षा जादा रक्कम द्यायची नाही असेही निर्देश दिले जातात. संबंधित बॅंकांना अशी नोटीस दिल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा बॅंकेकडेसुद्धा दिली जाते. 

आरबीआयच्या पीसीए अर्थात प्रॉम्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन ३५ (ए) नुसार असे निर्बंध घातले जातात. आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या बॅंकांची थकबाकी १५ टक्‍यांपेक्षा अधिक असल्यावर आरबीआयकडून अशा पद्धतीची कारवाई केली जाते. या कारवाईनंतर संबंधित बॅंक कोणतीही नवीन शाखा सुरू करू शकत नाही. नोकरभरती करू शकत नाही. कर्ज घेऊ शकत नाही आणि देऊ शकत नाही.

५ हजारांपेक्षा अधिक रक्कम ते सभासदांना देऊ शकत नाहीत. आजारी व्यक्तींना ते जादा पैसे द्यायचे असल्यास त्यासाठी आरबीआयकडून मान्यता घ्यावी लागते. तसेच साधारण सात टक्के आणि दहा टक्के एन.पी.ए. असल्यास संबंधित बॅंकेस आर्थिक व्यवहार सुधारण्याच्या सूचना दिल्या जातात; मात्र पंधरा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक एन.पी.ए. झाल्यास पीसीए (ए) नुसार ही कारवाई केली जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

ठेवीदारांची सर्व रक्कम कोणत्याही क्षणी परत करण्याची क्षमता बॅंकेची आहे. सदर निर्बंध हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती आणि तरलता उत्तम आहे. सभासद व ठेवीदारांना भीतीचे कोणतेही कारण नाही. ग्राहकांनी विश्‍वास ठेवून सहकार्य करावे. उद्या (ता. ७) मुंबईत होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय होतील. 
- आर. पी. पाटील, अध्यक्ष, यूथ बॅंक;
- अरुण नरके, ज्येष्ठ संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com