Belgaum : बेळगावात पावसाची पुन्हा हजेरी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

बेळगावात पावसाची पुन्हा हजेरी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

बेळगाव : शहर आणि परिसरात बुधवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळच्या सत्रात अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते तसेच अनेक सकल भागात पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना दिवसभर त्रास सहन करावा लागला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू असून अवेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून मंगळवारी ढगाळ वातावरण होते मात्र पावसाने उसंत घेतली होती. परंतु बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून शहराच्या सर्व भागात सह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पावसाचा जोर बराच वेळ कायम राहिल्याने वाहतूकीवरही परिणाम झाला तसेच ठीक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने वाहने संथगतीने चालवावी लागत होती त्यामुळे काँग्रेस रोड, उद्यमबाग, गोवा वेस सीबीटी आदी भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळत होत्या. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच पावसाला सुरुवात झाल्याने कामगार वर्ग व शाळकरी मुलांना ही त्रास सहन करावा लागला.

सकाळी दहानंतर पावसाचा जोर कमी झाला तरी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारठा निर्माण झाला असून बदलत्या हवामानामुळे अनेकजण सर्दी ताप आधी आजारांनी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडे ही गर्दी पाहण्यास मिळत असून नागरिकांना थंडीबरोबरच पावसाचाही सामना करावा लागत असल्याने  अनेकांना आजारांचा सामना करावा लागत आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी गटारीतील कचरा रस्तावर आल्याची दिसून येत असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर अवेळी सलग पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गाची ही चिंता वाढली असून कापणी केलेली पिके कुजून गेल्यामुळे शेतकऱ्यांना अवेळीचा मोठा फटका बसला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे.

loading image
go to top