महापुराच्या बनावट लाभार्थ्यांचा होणार पंचनामा; 104 गावांत फेरचौकशी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

गेल्यावर्षीच्या महापुरानंतर शासनाने दिलेल्या घर पडझडीच्या भरपाईचे फेरपंचनामे सुरु करण्यात आलेत.

सांगली : गेल्यावर्षीच्या महापुरानंतर शासनाने दिलेल्या घर पडझडीच्या भरपाईचे फेरपंचनामे सुरु करण्यात आलेत. महसूल, जिल्हा परिषद प्रशासनाने मोहिम राबवली आहे. घर पडलेले नसताना 95 हजार शंभर रुपयांचे अनुदान लाटणाऱ्यांकडून वसुली होणार आहे. 104 गावांत महापूर अथवा त्यानंतर घरे पडूनही लाभ न मिळालेल्यांचे फेरपंचनामे सुरु झालेत. त्याचा अहवाल 10 जुलैला सादर होईल. 

गतवर्षी महापुरात अनेक लाभार्थी वंचित राहिले. पावसाळ्यानंतर अनेक घरे पडली. त्यांना मदत मिळाली नाही. पंचनामे करण्यात आले नाहीत. मदत व पुनर्वसन विभागाकडून तत्काळ निधी देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. जिल्हा प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिलेत. 

महापुरात तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक बेघर झाले. पडलेली घरे, अंशत: पडलेली घरे, शासकीय इमारतींचे 338 कोटींचे नुकसान झाले. जिल्ह्यातील 9 हजार 391 घरांची पूर्णत: पडझड झाली. 18 हजार 636 घरांची अंशत: पडझड झाली. 1923 गोठ्यांना पुराची झळ बसली. पूर्णता पडलेल्या घरांना 95 हजार शंभर आणि अंशत: पडलेल्या घरांसाठी 6 हजार रूपये असे 97 कोटींचे वाटप झाले. ते योग्य हातात गेले आहेत का, याची फेरचौकशी सुरु आहे. 

दुधगावात गुन्हा ? 

दुधगाव येथे एकाच नावाचे दोन लाभार्थी आहेत. एका लाभार्थीच्या बॅंक खात्यात अंशत: घर पडझडीचे 6 हजार व संपूर्ण घर पडल्याचे 95 हजार रुपये जमा झाले. ग्रामपंचायत प्रशासनाने चुकून आलेले 95 हजार रुपये योग्य लाभार्थीला परत देण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र रक्कम न भरल्याने संबंधित लाभार्थी घरावर बोजा नोंद करण्यासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मिरजेच्या गटविकास अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Re-investigation of fake beneficiaries of flood in 104 villages