"यामुळे' करावा लागतोय सोलापुरात "यांना' महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर

E-Toilet
E-Toilet

सोलापूर : "नाव मोठं आणि लक्षण खोटं' ही म्हण वेगळ्या अर्थानेही वापरता येईल. कारण, 2014 मध्ये मोदी सरकारने "स्मार्ट सिटी' ही संकल्पना सुरू केली. यात सोलापूरचाही समावेश झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे सुलभ होईल, अशी शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र, या स्मार्ट सिटीमुळे अद्याप तरी सोलापूरकरांच्या जगण्यात म्हणावा तसा बदल झालेला नाही. अर्थात त्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा देण्यास सरकारला अपयश आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली अनेक कामे पूर्ण झालेली नाहीत. जी झालेली आहेत त्यांचाही पूर्णपणे उपयोग नागरिकांना करता येत नाही. काही कामे फक्त दिखावा म्हणून केल्याचे समोर आले आहे.

स्मार्ट सिटीच्या यादीत सोलापूरचे नाव
मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानक असलेले सोलापूर शहर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात मराठीसह तेलुगु, कन्नड व हिंदी भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. त्यामुळे बहुभाषिक जिल्हा म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते. कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर हा जिल्हा आहे. सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगा चटणी ही देशभर प्रसिद्ध आहे. मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या "स्मार्ट सिटी' योजनेत देशातील इतर शहरांच्या यादीत सोलापूरचे नाव झळकले आणि त्याची अनेक कामेही सध्या सुरू आहेत तर काही पूर्णत्वास गेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे "ई-टॉयलेट'!

स्वच्छतागृहाचा प्रश्‍न गंभीर
सोलापूर जिल्ह्यातून प्रशासकीय कामांसाठी 11 तालुक्‍यांतून नागरिकांना सोलापूर शहरात यावे लागते. शहरात झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणात आहे. विडी कामगार येथे मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील पूर्वभाग, जुळे सोलापूर, मध्यवर्ती भाग अशा प्रत्येक भागातील नागरिकांचे वेगळेपण आहे. काही ठिकाणी सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे तर काही ठिकाणी याचे प्रमाण कमी आहे.
स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असलेल्या या शहरात स्वच्छतागृहांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत "ई-टॉयलेट' उभारण्यात आले आहेत. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या अतिशय सुसज्ज असलेल्या या टॉयलेटमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहेत. महिला व पुरुषांना या स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पैसे टाकावे लागतात. मात्र, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नव्हती. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने स्वच्छतागृहाबाहेर त्याचा कसा वापर करावा, याची माहिती देणारे फलक लावले आहेत. त्यामुळे त्याचा वापर आता वाढू लागला आहे.

एकच स्वच्छतागृह सुरू
स्मार्ट सिटीत नागरिकांनी ई-टॉयलेटचा वापर कसा करावा, याबाबत ई-टॉयलेटच्या बाजूला नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने फ्लेक्‍स लावले आहेत. मात्र, आता अनेकदा ई-टॉयलेटच बंद आहेत. सात रस्ता परिसरातील शासकीय दूध डेअरीच्या बाजूला असलेल्या टॉयलेटमध्ये अनेकदा पाणी नसते. तर काहीवेळा एकच टॉयलेट सुरू असते. येथील स्वच्छतागृह बंद असल्याने पुरुषांना महिलांचे स्वच्छतागृह वापरावे लागत आहे. पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात वापर करणाऱ्या नागरिकांचे पैसे जात आहेत; मात्र दरवाजाच उघडत नाही. विजयपूरला जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे कायम रहदारी असते. एवढ्या रहदारीच्या ठिकाणचे स्वच्छतागृह जर बंद असेल इतर ठिकाणची काय स्थिती असेल, याचा अंदाज येत आहे. याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एका ट्रकचा वाहक म्हणाला, लाखो रुपये गुंतवून उभारलेले स्वच्छतागृह बंद आहे. येथे एकच स्वच्छतागृह सुरू असून नाइलाजाने महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. हा स्मार्ट सिटीतील नागरिकांच्या दृष्टीने लज्जास्पद प्रकार आहे.

असा करा ई-टॉयलेटचा वापर
1) आपण शौचालयाजवळ गेल्यानंतर शौचालय आपल्याला आवाजाच्या स्वरूपात सूचना देईल.
2) शौचालयात प्रवेश करण्यासाठी कोणतेही नाणे (रुपये 1, 2, 5, 10) वापरू शकता. परंतु शिल्लक रक्कम परत येणार नाही.
3) नाणे टाकल्यानंतर आपल्याला दरवाजा उघडण्याची सूचना येईल किंवा नाणे परत येईल.
4) आत दुसरा वापरकर्ता असल्यास किंवा वीज, पाणी नसल्यास नाणे परत येईल.
5) नाणे स्वीकारल्यास 15 सेकंदांच्या आत दरवाजा ढकलून उघडावा.
6) दरवाजा उघडल्यानंतर शौचालयाचे भांडे स्वच्छ होईल.
7) शौचालयाच्या आत आरसा, दिवा व पंखा आहे.
8) आतमध्ये हात धुण्याकरिता सेन्सर असलेला नळ आहे.
9) बटण दाबून शौचालय स्वच्छ करू शकता.
10) शौचालयात कोणीही नसताना वारंवार स्वच्छ होत जाईल.
11) हे शौचालय स्वच्छ करण्यासाठी व हात धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो.
12) शौचालय स्वच्छ राखण्यासाठी प्रेशर जेटिंग सिस्टिमचा वापर केला जातो.
13) हे शौचालय कमीत कमी ऊर्जेचा वापर करते.
14) हे शौचालय स्वच्छ आणि आरोग्यदायक आहे.
15) आतून बंद केल्यानंतर बाहेरून कोणालाही प्रवेश करता येत नाही.
16) बाहेर पडण्यासाठी दरवाजाचे हॅंडल वळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com