नाहिशा झालेल्या दुर्गंधीचे पुन्हा साम्राज्‍य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

सातारा - स्वच्छता हा आरोग्य सुधारणेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशीतैशी झालेली आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून नाहिशी झालेल्या दुर्गंधीने पुन्हा एकदा रुग्णालयात प्रवेश केल्याने रुग्णालयात तोंड धरून वावर करावा लागत आहे.

सातारा - स्वच्छता हा आरोग्य सुधारणेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशीतैशी झालेली आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून नाहिशी झालेल्या दुर्गंधीने पुन्हा एकदा रुग्णालयात प्रवेश केल्याने रुग्णालयात तोंड धरून वावर करावा लागत आहे.

स्वच्छता असेल तर, वातावरण प्रसन्न राहते. परिसर निर्जंतुक राहतो. याच हेतूने यापूर्वीच्या जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाचे वातावरण प्रसन्न व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. जिल्हा रुग्णालयाचा बंद असणारा एक दरवाजा, अडगळीत पडलेले जिने त्यांनी खुले केले. रुग्णालयाच्या वास्तूतील प्रत्येक भाग स्वच्छ राहील, याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा.  

कोठेही घाण आढळली तर तातडीने ती स्वच्छ करून घेतली जात होती. आपल्या फेरीमध्ये कर्मचारी, रुग्णांच्या अडचणींबरोबरच स्वच्छतेकडे जास्त लक्ष असायचे. कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन या सर्व कृती केल्या गेल्या होत्या. त्यामुळे रुग्णालयाच्या विविध भागात हवा खेळती झाली होती. कोणत्याही खासगी रुग्णालयाला लाजवेल असे जिल्हा रुग्णालयाचे स्वरूप झाले होते. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला हा बदल चटकन जाणवत होता. गेल्या दोन वर्षांपासून मात्र, हे चित्र पुरते बदलून गेले आहे.

स्वच्छतेची ऐशीतैशी सुरू आहे. स्वच्छतेसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली गेली. शासनाच्या नियमाचे कारण त्याला दिले जात आहे. मात्र, आहे त्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे वरिष्ठांचीच जबाबदारी आहे. ती पार पाडली जात नाही. कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेण्यात त्यांना अपयश आले आहे. दुसरी गंभीर बाब कर्मचाऱ्यांकडून समजली ती म्हणजे स्वच्छेतेसाठी साधनेही पुरवली जात नाहीत. कर्मचाऱ्यांना झाडू, खराटे अगदीच काय निरमा व हारपीक सारखी स्वच्छतेसाठी आवश्‍यक असलेली उत्पादनेही पुरेसी दिली जात नाहीत. अनेकदा कर्मचाऱ्यांनी, वॉर्डप्रमुखांनी याबाबत वरिष्ठांकडे मागणी केली आहे. मात्र, त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे रुग्णालयातून गायब झालेली दुर्गंधी पुन्हा जाणवू लागली आहे. औषधाच्या रांगेत उभे राहिलेल्या रुग्णांना तर, गुदमरायला होत आहे.

अनेक वॉर्डची अशीच अवस्था आहे. त्यामुळे रुग्णालयाचे वातावरण दूषित होत चालले आहे. त्याचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार हे नक्की. त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

पाण्याची कमतरता!
स्वच्छतेसाठी पाण्याचीही आवश्‍यकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. अनेकदा टॅंकर मागवावा लागतो. त्याचा स्वच्छतेवर परिणाम होतो . मात्र, पुरेशा पाण्याअभावी जिल्हा रुग्णालयातील डायलिसीस विभागही पूर्ण क्षमतेने चालविला जात नाही. त्यामुळे रुग्णांचे डायलिसीस पुढे ढकलेले जात आहे. ‘वेटिंग लिस्ट’ वाढत आहे. ही गोष्ट रुग्णांच्या जिवावर बेतणारी आहे.

Web Title: Rebellion of bad luck again Empire