Vidhan Sabha 2019 : शिवसेनेसमोर बंडखोरांचे आव्हान!

परशुराम कोकणे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांचे धनुष्यबाण रोखण्यासाठी बंडखोर नारायण पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे.

सोलापूर : भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना नाराज, बंडखोरांनी आव्हान दिले आहे. करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी रश्‍मी बागल यांना आव्हान दिले आहे. तर शहर मध्य मतदारसंघात बंडखोरी केलेल्या महेश कोठे यांनी दिलीप माने यांचे टेन्शन वाढविले आहे. 

करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांचे धनुष्यबाण रोखण्यासाठी बंडखोर नारायण पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. विद्यमान आमदार असतानाही नारायण पाटील यांना शिवसेनेने शेवटपर्यंत झुलवत ठेवले. तानाजी सावंत यांच्याकडून उमेदवारीबाबत थेट नकार आल्यानंतर पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

शहर मध्य मतदारसंघात तानाजी सावंतांमुळे माजी आमदार दिलीप माने यांना संधी मिळाली. उमेदवारी न मिळाल्याने सावंतांवर आरोप करत महेश कोठे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. माने यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, तर कोठे यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक आहेत. आता प्रत्यक्ष प्रचारात कोण-कोण सहभागी होतेय, हे पाहावे लागणार आहे. 

सांगोला मतदारसंघात माजी आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेकडून नशीब अजमावत आहेत. याठिकाणी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असेलल्या राजश्री नागणे यांनी बंडखोरी केली आहे. नागणे यांच्याकडे भाजप पश्‍चिम महाराष्ट्र प्रचार व प्रसिद्धीप्रमुख पद होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघात गेल्याच महिन्यात भाजपतून शिवसेनेत आलेल्या नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेची लॉटरी लागली आहे.

याठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने मनोज शेजवाल यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. विद्यमान आमदार रमेश कदम यांनीही शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने तेदेखील अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. 

माढा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये एकमत घडवून संजय कोकाटे यांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे. कोकाटे हे भाजपचे माढा तालुकाध्यक्ष असून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आहेत. याठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी कांबळे यांना अपेक्षा होती, पण त्यांना माघार घ्यावी लागली. 

बार्शी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना शिवसेनेने संधी दिली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार राजेंद्र राऊत इच्छुक होते. त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊसाहेब आंधळकर यांनीही शिवसेनेकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही : शरद पवार

- महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड

- Vidhan Sabha 2019 : आता महायुतीच्या नेत्यांनी राजकीय वजन दाखवावे : मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebels challenge to Shiv Sena for Maharashtra Vidhansabha 2019