सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय : पालकमंत्री जयंत पाटील

बलराज पवार
Saturday, 26 September 2020

सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढत आहे. जिल्ह्यात आवश्‍यक बेड्‌स उपलब्ध आहेत. आणखी बेड्‌स वाढवले जाणार आहेत, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. 

सांगली : सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढत आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोकांच्या अँटिजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहे. जिल्ह्यात आवश्‍यक बेड्‌स उपलब्ध आहेत. आणखी बेड्‌स वाढवले जाणार आहेत, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले मत व सूचना मांडल्या. बैठकीत सांगली जिल्ह्यासाठी वाढीव निधीची मागणीही जयंत पाटील यांनी केली. लोकांमधील अस्वस्थता आता कमी झाली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता भासत आहे त्याकडे शासनाचे लक्ष वेधले. तसेच ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा मोफत केला जात आहे.

निमशासकीय रुग्णालयातही कमी दरात औषध उपलब्ध केले जात आहे. त्याप्रमाणे इतर जिल्ह्यातही रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व अन्य औषधे उपलब्ध करून द्यावीत भविष्यात रुग्णांमध्ये वाढ होणार असेल तर त्यासाठी शासनाने आधीच यंत्रणा सज्ज करायला हवी. तसेच रुग्णालयांमध्ये वाढ करायला हवी, अशा सूचना जयंत पाटील यांनी केल्या. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery rate is increasing in Sangli district : Jayant Patil