esakal | पुन्हा लाल-पिवळा लावण्याचा प्रयत्न; बेळगावात 12 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा लाल-पिवळा लावण्याचा प्रयत्न; बेळगावात 12 जणांना अटक

पुन्हा लाल-पिवळा लावण्याचा प्रयत्न; बेळगावात 12 जणांना अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या उभारलेल्या ध्वजस्तंभावर नवा लाल-पिवळा झेंडा (red-yellow flag) लावण्याचा प्रयत्न (५) पोलिसांनी हाणून पाडला. नवा झेंडा लावण्यासाठी गेलेला श्रीनिवास ताळूकर व त्याच्या सहकाऱ्यांची पोलिसांनी खरडपट्टी काढली. यावेळी ताळूकर व पोलिस अधिकाऱ्यांत (police) जोरदार शाद्बिक चकमक झाली. ताळूकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी महापालिका (belgaum corporation) कार्यालयाच्या आवारात काही काळ तणावही निर्माण झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही मराठी तरुणही त्या ठिकाणी पोहोचले, पण पोलिसांनीच ताळूकरला तेथून हुसकावून लावल्यामुळे मराठी तरुण शांत राहिले. महापालिका कार्यालयाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

श्रीनिवास ताळूकर, कस्तुरी भावी व सहकाऱ्यांनी २८ डिसेंबर २०२० रोजी महापालिकेसमोर अनधिकृतपणे ध्वजस्तंभ उभारून त्यावर लाल-पिवळा झेंडा फडकविला आहे. तो झेंडा हटविण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती, तसेच अन्य मराठी संघटनांनी अनेकदा करूनही तो झेंडा अद्याप तेथेच आहे. ८ मार्च रोजी या झेंड्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा काढला होता. त्याच दिवशी मराठी भाषिक महिलांनी गनिमी काव्याने महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी महिलांना अटक केली होती.

हेही वाचा: लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अनेकदा झेंडा हटविण्याची मागणी होऊनही जिल्हाधिकारी, तसेच पोलिस प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत हा झेंडा कळीचा मुद्दा ठरला. म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना १ लाख १७ हजार मते मिळाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रीय पक्ष व प्रशासनालाही झेंड्याचा मुद्दा किती गंभीर आहे, हे कळून चुकले. कोरोना व लॉकडाउनमुळे झेंड्याचा मुद्दा शांत होता, पण सोमवारी ताळूकर याने पुन्हा हा विषय उकरून काढला. महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच पुन्हा तो सक्रिय झाला आहे, पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही.

मराठी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष

बेळगाव महापालिकेसमोर नवा झेंडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी तेथील अनधिकृत झेंडा हटविण्यासाठी जिल्हा किंवा पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आता महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी संघटनांच्या भूमिकेकडे मराठी भाषिकांचे लक्ष आहे.

हेही वाचा: लाच स्विकारतांना उपलेखापालासह तलाठी जाळ्यात; आजऱ्यातील घटना

ताळूकरसह ११ जणांवर गुन्हा

महापालिकेसमोरील नवीन लाल-पिवळा झेंडा लावल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी श्रीनिवास ताळूकर याच्यासह ११ जणांविरोधात मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णावर यांनी फिर्याद दिली आहे. २८ डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिकेसमोर श्रीनिवास ताळूकर व त्याच्या साथीदारांनी बेकायदा लाल-पिवळा झेंडा उभा केला होता. त्यामुळे शहरात भाषिक तेढ निर्माण झाला होता. सदर बेकायदा झेंडा उभारूनही पोलिसांनी त्यावेळी आगळीक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. आज पुन्हा ताळूकर याने महापालिकेसमोर जुना लाल-पिवळा झेंडा हटवून नवीन लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मार्केटचे सहायक पोलिस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांनी त्याला चांगलेच फटकारले.

loading image