चित्रपट महामंडळात प्रादेशिक वादाची ठिणगी

चित्रपट महामंडळात प्रादेशिक वादाची ठिणगी

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात प्रादेशिक वाद पुन्हा उफाळला असून महामंडळाच्या कार्यालयासाठीच्या जागा खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर कोल्हापूर की पुणे कार्यालयासाठी जागा, या विषयावरून वादाला तोंड फुटले असून या साऱ्या घडामोडीत कार्यवाह रणजित जाधव यांचा राजीनामा मंजूर झाला आणि अभिनेता सुशांत शेलार यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड झाली आहे. 
महामंडळाची एप्रिल २०१६ मध्ये झालेली निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली. त्यानंतर तब्बल पावणेतीन वर्षांनी नुकतीच सर्वसाधारण सभा झाली.

या सभेत कोल्हापूर मुख्य कार्यालयासाठी नवी जागा घेऊन कॉर्पोरेट कार्यालय उभारणे, पुणे व मुंबई कार्यालयांसाठीही नवीन जागा खरेदीला मंजुरी मिळाली. येथील कार्यालयासाठी जुना देवल क्‍लबच्या जागेबाबत वारंवार चर्चा सुरू होती. सभेत जागा खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतर या जागेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. येथील कार्यालयात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. मात्र, ही बैठक झालीच नाही. दरम्यान, अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुण्यातील कार्यालयासाठी जागाखरेदीचा आग्रह कशासाठी धरला, असा सवाल उपस्थित करीत येथील चार संचालकांनी पुण्यातील बैठकीवर बहिष्कार टाकला. 

सुशांत शेलार नवे प्रमुख कार्यवाह
मतमोजणीवेळी सुशांत शेलार आणि विजय पाटकर यांच्यात मोठी रस्सीखेच झाली होती. श्री. पाटकर विजयी घोषित झाल्यानंतर श्री. शेलार यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर फेर मतमोजणीचा आदेश होऊन श्री. शेलार यांना विजयी घोषित करण्यात आले. आता तेच महामंडळाचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम पाहणार आहेत.

महामंडळाचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे असतानाही पुणे व मुंबईला अधिक महत्त्व दिले जाते आहे. महामंडळाच्या कारभाराचा केंद्रबिंदू पुणे झाल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. श्री. राजेभोसले संचालकांना विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, अशी रणजित जाधव यांची वारंवार तक्रार होती.

त्यामुळे त्यांनी गेल्या दीड वर्षापासून पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली आणि काही दिवसांनी राजीनामा दिला. मात्र, त्याबाबत समन्वयाची भूमिका घेत कुठलीच कार्यवाही झालेली नव्हती. याबाबत अध्यक्ष श्री. राजेभोसले म्हणाले, ‘‘तिन्ही ठिकाणी जागा खरेदी करायच्या आहेत. पण, जेवढी आवश्‍यक आहे तेवढीच जागा खरेदी केली जाणार आहे. कारण जागेशिवाय बांधकाम आणि इतर गोष्टींसाठीही मोठा खर्च येणार आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com