
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी भारत स्टेज चार (बीएस-4) वाहनांच्या निर्मितीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादले.
बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनमुळे अनेकांना आपल्या बीएस-4 वाहनांची आरटीओकडे नोंदणी करता आली नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने तशा वाहनांची नोंदणी करुन घेण्यासाठी आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, 1 एप्रिल ते आतापर्यंत बेळगाव आरटीओकडे एकूण 1,167 बीएस-4 वाहनांची नोंदणी झाली आहे.
शुक्रवार (ता. 15) ही नोंदणी करुन घेण्याची शेवटची तारीख आहे. वाहनांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी भारत स्टेज चार (बीएस-4) वाहनांच्या निर्मितीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादले. त्यामुळे बीएस-4 वाहनानंतर आता बीएस-6 वाहने बाजारात दाखल झाली आहेत. अचानक बीएस-4 वाहनांच्या विक्रीवर निर्बंध आल्याने विक्रेतेही अडचणीत सापडले.
हेही वाचा - यात मोटारसायकलवरील तिघे फरफटत गेले
31 मार्च 2020 ही नोंदणीची अखेरची तारीख दिली होती. त्यातच या काळात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी झाली. त्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. अशातच विक्रेत्यांनी वाहनांच्या किमती कमी करुन त्यांची विक्री केली. परंतु, बहुतांश जणांना आपल्या वाहनांची आरटीओकडे नोंदणी करुन घेता आली नाही. त्यामुळे नोंदणीची तारीख वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
केंद्र सरकारने याची दखल घेत बीएस-4 वाहनांची नोंदणी करण्यासाठी आतापर्यंत चार वेळा मुदत वाढवून दिली. वाहनचालकांनीही या संबंधीचा चांगला लाभ घेतल्याचे पहावयास मिळाले. आरटीओमध्ये सध्या ऑनलाईन पध्दतीने नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व प्रकारच्या वाहनांचा किमान पाच वर्षाचा विमा भरणे बंधनकारक आहे. 15 जानेवारी ही शेवटची तारीख असून त्यानंतर बीएस 4 वाहनांची नोंदणी करुन घेणे बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर केवळ बीएस 6 वाहनांची नोंदणी करुन घेतली जाणार आहे.
हेही वाचा - बिबट्याचा वावर कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राच्या हद्दीत जास्त ; यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत
एप्रिल 2020 ते 11 जानेवारी 2021 पर्यंतची नोंदणी
दुचाकी - 1,033
एलएमव्ही - 84
इतर - 50
एकूण - 1,167
"बीएस-4 वाहनांचे उत्पादन बंद झाल्यानंतर अनेकांनी घाईगडबडीने वाहने खरेदी केली. मात्र, लॉकडाउनमुळे त्या वाहनांची अनेकांना नोंदणी करता आली नाही. त्यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत बेळगावात 1,167 बीएस-4 वाहनांची नोंदणी झाली आहे."
- शिवानंद मगदूम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेळगाव
संपादन - स्नेहल कदम