धार्मिक पर्यटनासाठी हवे प्रभावी मार्केटिंग 

- राजेंद्र खैरमोडे 
बुधवार, 25 जानेवारी 2017

"जगामध्ये मशहूर, असे आमचे कोल्हापूर' असं अभिमान गीत गाणारं कोल्हापूर पर्यटनाच्या दृष्टीनेही तितकेच समृद्ध. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विश्रांती, सामाजिक सुरक्षेसाठी राज्यातील ज्या काही शहरांचा आवर्जून उल्लेख होतो, त्यात कोल्हापूरचा निश्‍चितच वरचा क्रमांक लागतो. स्पर्धेच्या युगात इथला माणूसही बदलतो आहे, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करतो आहे; मात्र या बदलत्या दुनियेत आपली खास संस्कृती कोल्हापूरने आवर्जून जपली आहे. मुळातच प्राचीन व एक ऐतिहासिक शहर आणि निसर्गाच्या समृद्ध उधळणीचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख. त्याशिवाय धार्मिक पर्यटनावरही आता भर देणे आवश्‍यक आहे.

"जगामध्ये मशहूर, असे आमचे कोल्हापूर' असं अभिमान गीत गाणारं कोल्हापूर पर्यटनाच्या दृष्टीनेही तितकेच समृद्ध. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विश्रांती, सामाजिक सुरक्षेसाठी राज्यातील ज्या काही शहरांचा आवर्जून उल्लेख होतो, त्यात कोल्हापूरचा निश्‍चितच वरचा क्रमांक लागतो. स्पर्धेच्या युगात इथला माणूसही बदलतो आहे, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करतो आहे; मात्र या बदलत्या दुनियेत आपली खास संस्कृती कोल्हापूरने आवर्जून जपली आहे. मुळातच प्राचीन व एक ऐतिहासिक शहर आणि निसर्गाच्या समृद्ध उधळणीचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख. त्याशिवाय धार्मिक पर्यटनावरही आता भर देणे आवश्‍यक आहे. साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदिर म्हणजे जिल्ह्याचे वैभव आहे. करवीर तालुक्‍यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. "दख्खनचा राजा' जोतिबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. वाडी रत्नागिरी येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. जोतिबावर 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. शिरोळ तालुक्‍यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावरील नृसिंहवाडी येथे श्री दत्तात्रेयांचे पाचशे ते आठशे वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. हातकणंगले तालुक्‍यात आळते परिसरात डोंगरावर रामलिंग, धुळोबा ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा आहे. हे फार पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणेशमूर्ती आहे. त्यांच्यावर सतत पाण्याची धार असल्याने याठिकाणी छोटे पाणी तळे तयार झाले आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभू हे लिंगायत समाजाचे देवस्थान आहे. येथे मध्ययुगीन बांधणीचे अल्लमप्रभूंचे मंदिर आहे. याच तालुक्‍यात जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. कमालीची स्वच्छता व निसर्गसौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचा परिसर आहे. शिरोळ तालुक्‍यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कृष्णा नदीकाठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. भुदरगड तालुक्‍यात श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांची समाधी, सुरेख कोरीव दगडी महाद्वार त्यावर विविध शिल्पाकृती याठिकाणी साकारलेल्या आढळतात. मंदिरात अन्नछत्र आहे. एकूणच धार्मिक पर्यटनाला जिल्ह्यात मोठी संधी असून त्यादृष्टीने मार्केटिंग होणे गरजेचे आहे. 

Web Title: Religious tourism marketing to be effective