चंदगडच्या कन्या शाळेत दप्तर हलके-फुलके

सुनील कोंडुसकर
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पुस्तकांवरील मुखपृष्ठ...
पुस्तकाचे विभाजन आणि नवीन पुस्तकाच्या पुनर्बांधणीमुळे मुखपृष्ठाचा जिवंतपणा हरपू नये, याचाही विचार केला. नागपूरचे कलाकार सतीश ढोबळे यांच्याकडून कल्पक व अनुरूप मुखपृष्ठ बनवून घेण्यात आले.

चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. येथील कन्याशाळेतील शिक्षक अवधूत भोसले यांनी कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश साधले आहे.

सरकारचे निर्धारित वजन सुमारे साडेतीन किलो असताना भोसले यांनी दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक, खाऊचा डबा आणि पाण्याच्या बाटलीसह ते अवघ्या दोन किलोवर आणले आहे. भोसले यांच्याकडे सातवीचा वर्ग असून, शहरातील विविध वसाहतींसह हंबेरे, माळी, सुळये, कोळिंद्रे आदी पाच ते सहा किलोमीटरच्या गावातून विद्यार्थिनी शाळेला येतात. या वर्गाच्या दप्तराचे वजन सरासरी सात ते आठ किलो होते.

काही प्रयत्नातून ते सहा किलोपर्यंत कमी केले, परंतु ते वजन सरकारने निर्धारित केलेल्या (३३५७ ग्रॅम) वजनाच्या दुप्पटीपेक्षा जास्तच होते. खाऊचा डबा, पाण्याची बाटली व इतर आवश्‍यक साहित्य मिळून एक किलो वजन अपेक्षित असले तरी ते नियमात बसवणे शक्‍य नव्हते. परिपत्रकानुसार १०० पानी छोट्या आठ वह्या अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात पालकांनी मात्र ए ४ साईज २०० पानी वह्या खरेदी केल्या होत्या. त्यामुळे एकत्र वजन वाढत होते.

पहिल्या सत्रापर्यंत ते तसेच ठेवले. प्रत्येक विषयाच्या वह्या रोज न आणता रोज एका विषयाचा गृहपाठ तपासायचा, असे ठरवून वेळापत्रक निश्‍चित केले. त्यामुळे इतर वह्या कमी झाल्या. तरीही वजन अपेक्षेपेक्षा जास्तच होत होते. मग त्यांनी पाठ्यपुस्तकाकडे नजर वळवली. दर महिन्याचा पाठ्यक्रम ठरलेला असतो. त्यानुसार प्रत्येक पुस्तकातील महिन्याचा पाठ्यक्रम वेगळा केला. सर्व विषयांचा पाठ्यक्रम एकत्र करून एका महिन्याचे एकच पुस्तक अशी दहा महिन्यांची दहा पुस्तके तयार केलीत. 

पहिल्या सत्रात मोठ्या २०० पेजेस वह्या संपल्यानंतर मुलींना नवीन वह्या खरेदी न करता आखीव ताव आणायला सांगितले. दररोज तारीख टाकून त्यावर लिहायचे आणि घरात जाऊन ज्या-त्या विषयाच्या फाईलला लावायचे. त्यामुळे विद्यार्थी आता एक पुस्तक, सहा आखीव ताव, कंपासपेटी हे साहित्य एका फोल्डरमधून सहजपणे आणतात. त्याचे वजन अवघे ८०० ग्रॅम भरते. खाऊचा डबा व पाण्याच्या बाटलीची स्वतंत्र बॅग आणतात. हे सर्व मिळून दोन किलोपेक्षाही कमी वजन होते. 

पुस्तकांवरील मुखपृष्ठ...
पुस्तकाचे विभाजन आणि नवीन पुस्तकाच्या पुनर्बांधणीमुळे मुखपृष्ठाचा जिवंतपणा हरपू नये, याचाही विचार केला. नागपूरचे कलाकार सतीश ढोबळे यांच्याकडून कल्पक व अनुरूप मुखपृष्ठ बनवून घेण्यात आले.

Web Title: Remedy on School bag heavy weight in Chandgad