उदं गं आई उदंऽऽ...च्या जयघोषात आंबील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

रेणुका देवीची यात्रा उत्साहात - पोलिसांसह ८० स्वयंसेवक आणि ३५ जवान दिमतीला

कोल्हापूर - मंगळवार पेठेतील रेणुका देवीची आंबील यात्रा आज उदं ग आई उदंऽऽ...च्या जयघोषात पारंपरिक उत्साहात झाली. 

रेणुका देवीची यात्रा उत्साहात - पोलिसांसह ८० स्वयंसेवक आणि ३५ जवान दिमतीला

कोल्हापूर - मंगळवार पेठेतील रेणुका देवीची आंबील यात्रा आज उदं ग आई उदंऽऽ...च्या जयघोषात पारंपरिक उत्साहात झाली. 

पहाटे तीनपासून सुरू असलेली रांग रात्री दहापर्यंत कायम होती. पोलिसांसह ८० स्वयंसेवक आणि महाराष्ट्र कमांडो पथकाच्या ३५ जवानांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली. हजारो भाविकांनी श्रद्धेने देवीला आंबील आणि कांदाभाकरीचा नैवेद्य अर्पण केला. अनेक भाविकांनी रानमाळावर बसून नैवेद्याचा आस्वाद घेतला. रात्री दहाच्या सुमारास रविवार पेठ, गंगावेसमधील मानाचे जग बाहेर पडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

कर्नाटकातील सौंदत्ती येथील यात्रेचे जग कोल्हापुरात आल्यानंतर आज ओढ्यावरील रेणुका (यल्लम्मा) मंदिरात आंबील यात्रेला पहाटेपासूनच सुरवात झाली. पुजारी मदनआई शांताबाई जाधव यांनी पहाटे तीन वाजता देवीला अभिषेक घातला. किसन मिटकेकर यांनी फुला-पानांची आकर्षक पूजा बांधली. 

उदं गं आई उदंऽऽ..च्या जयघोषात यात्रेला सुरवात झाली. महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात पहाटे पाचच्या सुमारासच नैवैद्य घेऊन मंदिर परिसरात गर्दी केली. शिस्तीसाठी पोलिसांनी आदल्या दिवशीच दर्शन रांगांची चोख व्यवस्था केली होती. महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा आणि मध्ये पोलिसांचा बंदोबस्त असे नियोजन असल्यामुळे पहाटेपासून गर्दी असली तरीही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, मंदिरातील ८० स्वयंसेवक, आणि महाराष्ट्र कमांडोचे ३५ जवान तैनात होते. त्यांनी एकाच ठिकाणी कोठेही गर्दी होऊ दिली नाही. नैवेद्याची नासाडी होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. 

जवाहरनगर रस्ता, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, शाहू दयानंद हायस्कूल रस्ता आणि मैदानापर्यंत फेरीवाले आणि मनोरंजनाच्या खेळांनी जागा व्यापली होती. खाद्यपदार्थांच्या गाड्यांचीही रेलचेल होती. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी शुभेच्छांचे फलक आणि आंबील वाटप होत होते. 
 

मानाचे जग बाहेर पडल्यानंतर सांगता
दुपारी तासभर गर्दी कमी असली तरीही चारनंतर पुन्हा गर्दी वाढली. ॲड. प्रसन्न मालेकर यांनी धार्मिक विधीसह भाविकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. चार वाजता देवीची आरती आणि पालखी झाली. यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. रात्री दहाच्या सुमारास गंगावेस आणि रविवार पेठेतील मानाचे जग बाहेर पडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

Web Title: renukadevi yatra celebration