काळे धंदेवाल्यांची तक्रार करा आता बिनधास्त

सुधाकर काशीद
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

काळ्या धंद्याची माहिती देण्यासाठी पोलिसांचे खास फोन नंबर 
०२३१-२६६२३३३ व ०२३१-२६६५६१७

कोल्हापूर - आपल्या जवळपास एखादा गुन्हा घडत असतो. मटक्‍याचा अड्डा, जुगाराचा अड्डा चालू असतो. उजळमाथ्याने तेथे वावरणाऱ्या गुंडांचा रुबाब पाहून सर्वसामान्य माणसांचा संताप अनावर होतो; पण या विरोधात आवाज उठवायला तक्रार केली आणि पोलिसांनीच आपले नाव काळे धंदेवाल्यांना सांगितले तर नको ती आफत म्हणून सामन्य माणूस घाबरतो. पण आता पोलिसांनी तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवायचा शब्द सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे आणि काळ्या धंद्याची माहिती ०२३१ - २६६२३३३ व ०२३१ - २६६५६१७ या नंबरवर निर्भयपणे कळवण्याचे आवाहन केले आहे. 

अर्थात पोलिसांना प्रत्येक पोलिस ठाण्यातील डी. बी. पथकाला एलसीबीच्या पोलिसांना कोल्हापुरातले काळे धंदे माहीत नाहीत, म्हणून लोकांना हे आवाहन असा प्रकार अजिबात नाही. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मटक्‍याची छोटी टपरी सुरू करायची झाली, तरी त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीची ‘संमती’ असल्याशिवाय ती सुरू होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना त्यामुळेच तर शहरात जिल्ह्यात मटका उघडपणे सुरू आहे. सहज पैसा मिळवायचा आहे, तर काढ जुगाराचा अड्डा, असे इथले पैसे मिळवण्याचे शास्त्र झाले आहे. त्यामुळे पोलिसांना हे धंदे माहीत नाहीत अशी परिस्थिती नाही. पण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आता काळ्या धंद्याची माहिती थेट वरिष्ठ पातळीवर कळावी, यासाठी नागरिकांची मदत घ्यायचे ठरवले आहे आणि जो ही माहिती कळवेल, त्याचे नाव गुप्त राहील, याची हमी दिली आहे. 

कोल्हापुरात मटका अलीकडच्या काळात तत्कालीन अतिरिक्‍त पोलिस प्रमुख शहाजी उमाप व तत्कालीन जिल्हा प्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्या काळात काय तो बंद होता. पण त्यानंतर फोफावलेला मटका या क्षणीही जोमात सुरू आहे. ‘मटका व काळे धंदे बंद करणार’ असल्या घोषणा म्हणजे कोल्हापुरातला दर महिन्याचा एक विनोद ठरत आहे. कोण कोणाला येथे भित नाही अशी इथली परिस्थिती आहे. जुगार अड्डा हा तर काहींचा साईड बिझनेस झाला आहे. डी. बी., ‘एलसीबी’वाल्यांना मॅनेज केले तर काहीही अवघड नाही हे काळे धंदेवाल्यांनी दाखवूनच दिले आहे. 

...तर कोणीही पुढे येणार नाही
या साऱ्या पार्श्‍वभूमीवर काळ्या धंद्याची माहिती देण्यासाठी नागरिकांचा सहभाग ही आशादायक सुरुवात आहे. अर्थात माहिती देणाऱ्या नागरिकाचाच उलट तपास पोलिसांनी सुरू केला तर माहिती द्यायला कोणीही पुढे येणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि काही पोलिस व काळे धंदेवाल्यांचे संबध पाहता माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव कोणालाही कळणार नाही, याची पूर्ण जबाबदारी जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख यांची राहणार आहे. तसे झाले तरच हे आवाहन परिणामकारक ठरणार आहे. 

Web Title: report the illegal businessman to police