पत्रकार संरक्षण कायद्यासाठी कृती समितीचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

सांगली - पत्रकार संरक्षण कायदा करावा, यासह इतर मागण्यांसाठी सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन, वृत्तपत्र विक्रेते यांनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन एकीचे दर्शन घडवले.

सांगली - पत्रकार संरक्षण कायदा करावा, यासह इतर मागण्यांसाठी सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन, वृत्तपत्र विक्रेते यांनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन एकीचे दर्शन घडवले.

राज्यात पत्रकारांवर होत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची केली जाणारी मुस्कटदाबी, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्यास वीस वर्षे करत असलेली टाळाटाळ याविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे आज राज्यात सर्वत्र मूक मोर्चाचे आयोजन केले होते.

जिल्ह्यातील पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने जमले होते. काँग्रेस भवनसमोरून ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी, बापूसाहेब खराडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२.३० वाजता मूक मोर्चा निघाला. स्टेशन चौकात मोर्चा आल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून मोर्चा राजवाडा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला.

समितीतर्फे महसूल नायब तहसीलदार नागेश एडके यांना निवेदन दिले. पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळावे. पत्रकारांवरील हल्ले अजामीनपात्र गुन्हे करावेत. हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावेत. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन द्यावी, यासाठी पत्रकार दहा वर्षांपासून शांततेने लढा देत आहेत. पत्रकार संरक्षण कायदा आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याचे आश्‍वासन भाजपने सत्तेवर येऊन दोन वर्षात पूर्ण केले नाही. त्यामुळे सरकारने आता अंत पाहू नये, अशी विनंती निवेदनाद्वारे केली. दरम्यान, पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मीडिया असोसिएशन आदींनी पाठिंबा दर्शवला. खासदार संजय पाटील यांनाही समितीतर्फे निवेदन दिले.

 

समितीतर्फे स्वच्छता मोहीम
मोर्चा संपल्यानंतर कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार, नगर सचिव चंद्रकांत आडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करून परिसर चकाचक केला.

Web Title: reporter security law