जिल्हा बॅंकेच्या 16 संचालकांचे राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सांगली - जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलिप पाटील यांच्या कारभाराविरोधात धुमसणारी नाराजी, रेंगाळलेली नोकरभरती अशा पडद्याआडच्या कारणांची परिणती म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य अशा 16 संचालकांनी आज राजीनामे दिले. मंगळवारी सायंकाळनंतरच्या वेगवान घडामोडीअंती या संचालकांनी आपले राजीनामे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याकडे सोपवले आहेत. अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्‍य झाल्याचे कारण अनेक संचालकांनी सांगितले. 

सांगली - जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलिप पाटील यांच्या कारभाराविरोधात धुमसणारी नाराजी, रेंगाळलेली नोकरभरती अशा पडद्याआडच्या कारणांची परिणती म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य अशा 16 संचालकांनी आज राजीनामे दिले. मंगळवारी सायंकाळनंतरच्या वेगवान घडामोडीअंती या संचालकांनी आपले राजीनामे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याकडे सोपवले आहेत. अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्‍य झाल्याचे कारण अनेक संचालकांनी सांगितले. 

जिल्हा बॅंकेत दोन्ही कॉंग्रेसची सत्ता असून आता पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे संचालक भाजपवासी झाले आहेत. यापूर्वीही अध्यक्ष बदलासाठी अंतर्गत हालचाली झाल्या होत्या. अध्यक्ष विश्‍वासात घेऊन कारभार करत नाहीत, अशी तक्रार करत एप्रिल-मे दरम्यान या हालचाली झाल्या होत्या. तेव्हा ते बंड फसले होते. कालच दिलीप पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे. ते सध्या परदेश दौऱ्यावरही आहेत. या पार्श्‍वभूमीवर संचालकांचे राजीनामे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. 

राष्ट्रवादीच नव्हे तर कॉंग्रेसच्या काही संचालकांनीही अध्यक्षांविरोधात मोहिमेची सूत्रे हलवली होती. जिल्हा बॅंकेचे कामकाज सुरू करा, योग्य वेळ आल्यानंतर अध्यक्ष बदलाबाबत पाहू, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संचालकांना सांगितले होते. या काळात संचालकांच्या दोन बैठकांसह कार्यकारिणी समित्यांच्या बैठकांवर संचालकांनी बहिष्कार टाकला होता. 24 मे नंतर तापलेले वातावरण पुन्हा निवळले. गेल्या महिन्यांपासून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना श्री दत्त इंडियाला चालवायला दिलेल्या करारावरून वातावरण पुन्हा तापले. संचालकांनी हा करार करताना विश्‍वासातच घेतले नसल्याचे सांगितले. 

सांगली जिल्हा बॅंकेत 400 हून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यास सहकार विभागाने परवानगीही दिली. तरीही वर्षभरापासून त्या भरल्या जात नसल्याने संचालकांत नाराजी आहे. राज्यातील पाच जिल्हा बॅंकांत नोकरभरती झाली. मात्र, तेथील संचालक मंडळ या कारणावरून विद्यमान राज्य सरकारने बरखास्त केली. यामुळे अध्यक्ष टाळाटाळ करत होते. नोकरभरती प्रक्रिया सुरू करू, असे केवळ आश्‍वासन पाटील यांनी दिले होते. त्यातून असंतोष होता. अखेर मंगळवारी रात्री एकाचवेळी राजीनामे देण्यात आले. आता दोन्ही कॉंग्रेसचे नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, याबाबत कुतूहल आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाल 3 वर्षे पूर्ण झाला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड व्हावी, अशी संचालकांची मागणी आहे. जयंत पाटील यांनी संचालकांच्या भावनांचा विचार करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनालाही चार महिने झाल्यानंतर पुन्हा एकदा संचालक अध्यक्ष बदलासाठी आक्रमक झाले आहेत. 

संचालकांच्या संस्थांची थकबाकी मोठी 
जिल्हा बॅंक संचालकांच्या विविध संस्था, त्यांच्या समर्थकांच्या संस्थांची कर्जे थकीत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जवसुली 80 टक्के आहे. त्याच्याच जीवावर बॅंकेचा कारभार सुरू आहे. बॅंकेच्या कारभारात थोडी जरी ढिलाई झाली तर जिल्हा बॅंक "एनपीए'त जाऊन पुन्हा प्रशासक येण्याची शक्‍यता आहे. 

सध्याचे बलाबल 
जिल्हा बॅंकेत 21 जणांच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेले भाजपचे खासदार संजय पाटील, संग्रामसिंह देशमुख, प्रताप पाटील तर आमदार अनिल बाबर शिवसेनेचे झाले. त्यानंतर झालेल्या पक्षांतरातून उदयसिंह देशमुख, चंद्रकांत हाक्के भाजपचे झाले. त्यामुळे आता भाजपचे 5, शिवसेना 1, कॉंग्रेसचे 5 आणि राष्ट्रवादीचे 10 असे बलाबल आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये सध्या भाजपमध्ये असलेल्या पूर्वाश्रमीच्या दोघा संचालकांचाही समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष बदलाबाबत राष्ट्रवादी सावध पवित्र्यात आहे. 

जिल्हा बॅंक संचालकांनी माझ्याकडे एक लिफाफा दिला आहे. तो अद्याप मी फोडलेला नाही. आम्ही आमच्या काळात चांगला कारभार केला आहे. आताच्या स्थितीबद्दल मला काही बोलायचे नाही. 
- आमदार मोहनराव कदम, अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेस. 

यांचे मौन... 
जिल्हा बॅंकेतील घडामोडींबाबत आज संचालकांचा कानोसा घेतला असता उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विशाल पाटील, विक्रम सावंत यांनी जाहीर प्रतिक्रियेस नकार दिला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Resignation of 16 Directors of District Bank