आरोग्याचा "धुरळा'... तुम्‍ही आहात याचे शिकार?

Dust On Road Satara
Dust On Road Satara
Updated on

सातारा : येथे सुरू असलेली ग्रेडसेपरेटरसह इतर विकासकामे, तसेच जिल्हाभरातील रस्त्यांची कामे यामुळे धूळ उडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याचे दुष्परिणाम लोकांना तीव्रपणे भोगावे लागत आहेत. वाहन जाताच धुरळा उडत असून, तो इतरत्र पसरत आहे. नाक-तोंड दाबून लोकांना रस्त्यावरून चालावे लागते, अशी स्थिती साताऱ्यासह बहुतांश शहरांमध्ये निर्माण झाली आहे. अनेकांना श्‍वसनाचा, खोकल्याचा त्रास होऊ लागला असून, अशा रुग्णांच्या संख्येत 20 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. 

सातारा शहरात ग्रेडसेपरेटरचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड धुरळा उडत आहे. याशिवाय, शहरात भुयारी गटाराचीही कामे सुरू आहेत. त्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत.

जिल्ह्यातील कऱ्हाड-पाटण, सातारा-लातूर, फलटण-कऱ्हाड, फलटण-वडूज, सातारा-रहिमतपूर, सातारा-मेढा या प्रमुख राज्य मार्गांची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांत मुरूम टाकण्यात आला आहेत. त्यामुळे मोठी वाहने जाताच प्रचंड धूळ हवेत उडते. धूळ डोळ्यात गेल्याने डोळे चुरचुरतात. त्यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याचीही भीती आहे. तीच धूळ पुन्हा आजूबाजूच्या घरांमध्ये, शेतांमध्ये पसरत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. शिवाय, झाडांची वाढही खुंटू लागली आहे. 

पोलिसदादा बेजार 

शहरांत सर्वत्र धुळीचे लोट उसळत आहेत. शिवाय, वाहनांचे प्रदूषणही जास्त आहे. चौकांत, सिग्नलजवळ तसेच मोक्‍याच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची "ड्युटी' असते. त्यामुळे ते धुळीच्या त्रासाने बेजार होत आहेत. त्यांच्यात नेत्रविकारासोबतच श्‍वसनाचेही विकार बळावत आहेत. घसा खाकरला तर मातीमिश्रित काळी थुंकी बाहेर पडते, अशी बिकट अवस्था वाहतूक पोलिसांची झाली आहे. 

...हे होतात त्रास

नैसर्गिक धुके, प्रदूषणामुळे होणारा धूर यामुळे सूक्ष्म धुलीकणांचे जटील घटक तयार होतात. ते श्‍वसन संस्था, त्वचा व डोळे यावर गंभीर परिणाम घडवू शकतात. विशेषत: गरोदर माता, लहान मुले, वृध्द यांच्यावर जादा दुष्परिणाम होतात. श्‍वास घेण्यास त्रास होणे, खोकला, नाक चोंदणे, सर्दी, घसा दुखणे, कफ पडणे, छातीत खरखर करणे, डोळे चुरचुरणे, चक्‍कर येणे, मळमळ, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आदी त्रास होतात, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

स्वच्छ कापडी मास्क वापरावा, गॉगल वापरावा, अंगभर उबदार कपडे घालावीत, घरी आल्यानंतर त्वचा, डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. पुरेसे पाणी प्यावे. व्हिटॅमिन सीयुक्‍त फळे खावीत. ऍलर्जीक सर्दी, खोकला असल्यास पाणी उकळून वाफ घेणे, गरम पाण्याच्या गुळण्या करणे, हळद टाकून दूध घेणे आदी उपाय धुळीच्या त्रासापासून संरक्षणासाठी करू शकता.
डॉ. ऋतुराज देशमुख,
शाहूनगर, सातारा


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com