Video : शिवेंद्रसिंहराजे काळजी करू नका ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

मेढा (जि. सातारा) येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्री महाेदयांना भाषणांतून विकासकामांसाठी आग्रह धरला. विकासकामांचा आग्रह धरताना ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही शिवेंद्रसिंहराजेंनी चिमटे काढले. त्यावेळी सर्वजण हास्यकल्लाेळात बूडाले.

मेढा (जि. सातारा) : जिल्ह्यात अलीकडच्या काळात खुनशी राजकारण वाढू लागले आहे, अशी खंत विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. येथे आमदार जी. जी. कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. निंबाळकर बोलत होते. 

या प्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा  Video : मोदी-शहांना जनता माफ करणार नाही ः जयंत पाटील

श्री. निंबाळकर म्हणाले, ""राज्याच्या विकासात राष्ट्रवादी कॉंग्रेससारखा पक्ष नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार भल्याभल्यांना समजणार नाहीत. विकास हे न संपणारे व्रत आहे. जिल्ह्याच्या राजकारणाला आदर्श संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांपासून आमदार जी. जी. कदम यांनी ती घातली. त्याच संस्कृतीचे जतन आज त्यांचे पुत्र अमित कदम करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे.''
 
पालकमंत्री पाटील म्हणाले, ""सहकारमंत्री म्हणून सहकारी कारखाना असू अथवा सहकारी संस्था यांस प्राधान्याने सहकार्य करणार आहे. दोन लाखापर्यंतचे कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विटा-सातारा मेढा-महाबळेश्वर रेंगाळलेला रस्ता तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. माझ्याकडे पालकमंत्रिपद आहे. त्यामुळे पालक म्हणून जिल्ह्यात डावे उजवे करता येणार नाही. त्यामुळे बाबाराजे आपण काळजी करू नका. आपणाला निधी कमी पडू देणार नाही. अडचणीत असताना स्वर्गीय भाऊसाहेब महाराज व बाबाराजे आपण केलेली मदत विसरता येणार नाही.'' 
त्यांनी या वेळी माजी आमदार (कै.) कदम यांना अभिवादन केले.

जरुर वाचा - फरोख कूपर यांनी उलगडली आपली यशाेगाथा

शंभूराज देसाई म्हणाले, ""जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, जिल्ह्याच्या जडणघडणीत अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर जी. जी. अण्णांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती आजही कायम आहेत. त्यांचे पुत्र अमित यांनी सूचित केलेल्या प्रतापगड कारखाना, दूध पुरवठा संघ आणि तापोळा येथे अधिकृत बोटिंग व्यवसाय परवानगी देण्याबाबत शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून मार्ग काढू.'' 

महाबळेश्वर : नीलम नारायण राणेंसह तीस मिळकतधारकांना नोटीस

खासदार पाटील म्हणाले, ""बी.एस.एन.एल टॉवरसह तालुक्‍यात सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे.'' 
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ""जी. जी. अण्णांच कामं मोठं असून, त्यांचे मतदारसंघातील काम उल्लेखनीय आहे. भाऊसाहेब महाराज व जी. जी. अण्णांनी सोबत काम केले आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा सातारा व जावली तालुक्याला सहकार्य राहावे अशी अपेक्षा ठेवताे.'' या वेळी शशिकांत शिंदे, सदाशिव सपकाळ, मानकुमरे आदींची भाषणे झाली. जिल्हा परीषदेचे माजी सभापती अमित कदम यांनी प्रास्ताविक केले. अशोक लकडे यांनी सूत्रसंचालन केले. जावळी बॅंकेचे माजी अध्यक्ष योगेश गोळे यांनी आभार मानले. 
कार्यक्रमाला जावळी व महाबळेश्वर पंचायत समितीचे पदाधिकारी व मेढा नगरपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinghraje Do Not Worry About Development Funds Says NCP Minister