गुरुजींच्या हरकतींवर दोन दिवसांत निकाल

दौलत झावरे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे 183 शिक्षकांनी बदलीप्रक्रियेवर हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर सात सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीचा निकाल कधी लागणार, याची शिक्षकांना असलेली प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या दोन दिवसांत यावर निकाल दिला जाणार आहे. 

नगर ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे 183 शिक्षकांनी बदलीप्रक्रियेवर हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर सात सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीचा निकाल कधी लागणार, याची शिक्षकांना असलेली प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या दोन दिवसांत यावर निकाल दिला जाणार आहे. 

जून महिन्यात झालेल्या शिक्षकांच्या बदलीप्रकियेमध्ये त्रुटी आहेत. काहींना ऑनलाइनवर भरलेल्या शाळांपैकी एकही शाळा मिळाली नाही. 
दुसरीकडे, एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्या. या बदलीप्रक्रियेवर अनेकांनी हरकती नोंदविल्या. बदलीनंतर सात दिवसांत हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घ्यावी, असा आदेश सरकारने बजावला होता. मात्र, तीन महिन्यांनंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्यासमोर सुनावणी झाली. 

सुनावणीनंतर त्याचा निकाल लवकर जाहीर होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, निकाल लागला नाही. निकाल विरोधात लागला, तर त्यावर आयुक्तांकडे दाद मागता येईल, यासाठी अनेक जण निकालाची प्रतीक्षा करीत होते. 

हरकतींसंदर्भात सुनावणी झाली 

प्राथमिक शिक्षकांच्या हरकतींसंदर्भात सुनावणी झाली. त्यावर येत्या दोन दिवसांत निकाल दिला जाणार आहे. 

- जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

शिक्षकांमधून नाराजी 

सुनावणी होऊन निकाल द्यायला दोन महिन्यांचा कालावधी लागल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अंतिम सुनावणी झाल्यानंतर एक महिन्यात निकाल लागणे अपेक्षित असताना, निकालाला उशीर का लागला, असा सवाल आता शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. 

सुनावणीला तीन तर निकालाला दोन महिने 

बदल्यांच्या प्रक्रियेवर शिक्षकांनी हरकती घेतलेल्या आहेत. त्या हरकतींवर सुनावणी घेण्यास तीन महिने तर निकाल द्यायला दोन महिने लागले. हा निकाल विरोधात गेला तर शिक्षकांना आयुक्तांकडे दाद मागावी लागणार आहे. तेथे कधी निकाल लागेल, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. 

रजा खर्ची घालाव्या लागणार 

बदली प्रक्रियेत झालेल्या अन्यायाविरुध्द न्याय मागण्यासाठी शिक्षकांना आता आयुक्त कार्यालयात न्याय मागण्यास जावे लागण्याची शक्‍यता आहे. हा न्याय मागताना त्यांना आता रजा खर्ची घालाव्या लागणार आहेत. हाच निकाल जर दिवाळीपूर्वी लागला असता तर शिक्षकांच्या रजा खर्ची पडल्या नसत्या, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Result on Guruji's objection in two days