
ग्रामपंचायत निवडणूक निकाल सोमवारी (ता. 18) असल्याने उमेदवार, पॅनेल प्रमुखांची धाकधूक वाढली आहे. मतदानानंतर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आकडेमोडीत अंदाज आलाच आहे.
सांगली : ग्रामपंचायत निवडणूक निकाल सोमवारी (ता. 18) असल्याने उमेदवार, पॅनेल प्रमुखांची धाकधूक वाढली आहे. मतदानानंतर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आकडेमोडीत अंदाज आलाच आहे. तरीही मतदान यंत्रावर जावून मतदारांनी काय केले आहे, याचा नेमका अंदाज येत नसल्याने मतदानाच्या आदल्या दिवशी काय गडबड झाली नसेल ना?, किती प्रभागात क्रॉस व्होटिंग झाले असेल, अशीही चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी बिनविरोध, तर शुक्रवारी 143 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. जिल्ह्यात 80.22 टक्के मतदान झाले असले तरी छोट्या गावांत जास्त, तर मोठ्या गावात कमी मतदान झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झालेले आहे.
मतदानावेळी जिल्ह्यात तणावपर्ण शांतता पहायला मिळाली. निवडणूक निकालानंतर ही शांतता कायम रहावी, अशी अपेक्षा आहे. तरीही पोलिसांकडून मतमोजणीच्या ठिकाणांसह संवेदनशील गावात त्या दिवशी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे.
क्रॉस व्होटिंगची भीती
गावात पॅनेलनिहाय प्रचार झाला असला, तरी शेवटच्या दिवशी अनेक गावात बहुतांश उमेदवारांवर एकेक मत मागायची वेळ आली होती. यामुळे यंदा पॅनेल फुटून येण्याची शक्यता आहे. यामुळे सरपंच पदासाठी कशी जुळवाजुळव करायची याची चिंता पॅनेल प्रमुखांना लागलेली आहे.
आकडेमाडीत सरस... आता मोजणीत?
मतदान संपल्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी काढलेल्या आकडेमोडीत अनेक उमेदवार सरस ठरले असले, तरी प्रत्यक्ष मतमोजणी यंत्राच्या निकालात काय होणार याची धाकधूक सर्वांनाच कायम आहे. सोमवारच्या मतमोजणीकडे सर्वांची नजर आहे. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मिळणाऱ्या मतांचा आकडा मतदार संख्येच्या अडीच पट असल्याची चर्चा सुरू आहे.
दृष्टिक्षेपात निवडणूक
संपादन : युवराज यादव