सरकारचा कर्जमाफी निर्णय अमान्य - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

रेठरे बुद्रुक - संघटनांशी चर्चेची गुऱ्हाळे व सुकाणू समितीची नाटके न करता काँग्रेस आघाडी सरकारने एका दिवसात देशात ७० हजार कोटींची कर्जमाफी केली. मात्र, भाजप सरकार केवळ चर्चेच्या नावाखाली कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आज- उद्याची भूमिका सतत बदलून विलंब करत आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीवर घेतलेली भूमिका मान्य नाही, असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

रेठरे बुद्रुक - संघटनांशी चर्चेची गुऱ्हाळे व सुकाणू समितीची नाटके न करता काँग्रेस आघाडी सरकारने एका दिवसात देशात ७० हजार कोटींची कर्जमाफी केली. मात्र, भाजप सरकार केवळ चर्चेच्या नावाखाली कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आज- उद्याची भूमिका सतत बदलून विलंब करत आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीवर घेतलेली भूमिका मान्य नाही, असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील विविध विकासकामांची उद्‌घाटने व विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. त्या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश मोहिते, किसनराव पाटील-घोणशीकर, संयोजक जयवंतराव ऊर्फ बंडानाना जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, माजी संचालक प्रताप देशमुख, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नानासाहेब पाटील, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रारंभी आमदार कदम व पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांची उद्‌घाटने झाली. आमदार कदम यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘शहरी लोकांची मर्जी सांभाळायची, उद्योगपतींचे लाड करायचे या फेऱ्यात गुंतलेले भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवत आहे. आमच्या आघाडी सरकारने एका दिवसात ७० हजार कोटींची कर्जमाफी केली. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी १३ हजार कोटी रुपये एका दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. असे असताना शेतकरी विरोधी भाजपच्या बाजूने या भागातील लोक जात असल्याचे दु:ख वाटते.’’ 

आमदार कदम यांनी सत्कारास उत्तर दिले. या वेळी आनंदराव पाटील, अविनाश मोहिते, अजितराव पाटील, जयवंतराव जगताप यांची भाषणे झाली. माजी उपसरपंच जयवंत जगताप, संतोष जगताप, राजाभाऊ जगताप, भगवानराव जगताप यांनी स्वागत केले. जे. जे. जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

सर्वात मोठा भ्रष्टाचार कृष्णा ट्रस्टमध्ये
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अविनाश मोहिते यांनी त्यांच्यावरील कारवाईनंतर प्रथमच जनतेशी संवाद साधला. सुरेश भोसले व अतुल भोसले या पिता- पुत्रांवर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले, ‘‘मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास मी तयार आहे. भोसले पिता- पुत्राने भाजपच्या सत्तेच्या जोरावर मला अडकवले. भोसले कुटुंबाने रानात दारं मोडून कृष्णा ट्रस्ट उभारलेला नाही. सभासदांच्या घामातून ट्रस्ट उभा झाला आणि तो त्यांनी स्वतःच्या घशात घातला.’’ ट्रस्टच्या रूपाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मलकापूरच्या माळावर पाहायला मिळतो, असा टोला त्यांनी लगावला. 

Web Title: rethare budruk satara news Government debt forgiveness decision invalid