कृष्णाकाठी कार्यकर्त्यांचा ‘पण’

अमोल जाधव
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

रेठरे बुद्रुक - कृष्णाकाठावर सहा ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक गटबाजी उफाळल्यामुळे विभागातील नेते प्रत्यक्ष समरस नसले, तरी कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःला पणाला लावल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजीवर डाव- प्रतिडाव आखले जात आहेत. प्रत्येक गावातील राजकीय समीकरण हे वेगवेगळे पाहायला मिळत आहे. 

रेठरे बुद्रुक - कृष्णाकाठावर सहा ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक गटबाजी उफाळल्यामुळे विभागातील नेते प्रत्यक्ष समरस नसले, तरी कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःला पणाला लावल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजीवर डाव- प्रतिडाव आखले जात आहेत. प्रत्येक गावातील राजकीय समीकरण हे वेगवेगळे पाहायला मिळत आहे. 

वडगाव हवेली, दुशेरे, रेठरे खुर्द येथे अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. तालुका पातळीवरील नेते या निवडणुकांकडे विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पाहत आहेत. सहाजिकच गावपातळीवरील कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन किंबहुना तडजोडीसाठी मध्यस्थी करण्याच्या हेतूने त्यांच्याकडे ये-जा करू लागले आहेत; परंतु याला बहुतांश प्रमाणात स्थानिक गटबाजीचा वास असल्याचे जाणवते. नेत्यांना तुमच्या राजकारणावेळी आम्ही बघू, असे सांगताना कार्यकर्ते दिसतात. त्यातून एकमेकांची जिरवा- जिरवी करण्यासाठी स्थानिक गटबाजी उफाळून आली आहे. कृष्णाकाठी मोहिते व भोसले गटाची ‘कमांड’ आहे. निवडणुका होणाऱ्या काही गावांमध्ये मोहिते व भोसले गटाविरोधात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर, ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते गट एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी मोहिते व भोसले गटामध्ये फूट पडून विरोधकांशी हातमिळवणी केल्याचे चित्र दिसत आहे. दुशेरे येथे ‘कृष्णा’चे संचालक धोंडिराम जाधव यांना घेरण्यासाठी सर्वच गटांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. तेथे जाधव यांची एकहाती सत्ता असली, तरी या निवडणुकीत त्यांना कडाडून विरोध करण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. हा विरोध शेवटपर्यंत टिकतो की नाही, हे पाहावे लागेल. गोंदी व जुळेवाडी येथे मोहिते व भोसले गटाचे वर्चस्व आहे.

तेथील निवडणुकीत हा गट एकतर्फी विजयी होण्याची शक्‍यता असली, तरी विरोधकांनीही आपण काही कमी नसल्याची तयारी दाखवली आहे. रेठरे खुर्द येथे भोसले गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजीचा मोठा सूर असल्याने सर्व विरोधक एकवटून या गटाला शह देण्याच्या तयारीत आहेत; पण भोसलेंचे कार्यकर्ते विरोधकांमध्ये फूट पाडण्याची व्यूहरचना आखत असल्याने विरोध शेवटपर्यंत टिकणार का, हे पाहावे लागणार आहे. एकूणच गावपातळीवरील कुरघोड्या, एकमेकांचे वादविवाद, गटबाजी यावर ग्रामपंचायत निवडणुकांची रणनीती अवलंबून आहे, हे नक्की.

वडगाव हवेली व आटकेच्या निवडणुकीकडे लक्ष
वडगाव हवेली येथे ‘कृष्णा’चे संचालक जगदीश जगताप यांच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत, तर आटके येथे पैलवान धनाजी पाटील यांना शह देण्याचीही विरोधकांनी तयारी सुरू केलेली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: rethare budruk satara news grampanchyat election