Maratha Reservation : चार-पाच महिने राबल्याचे चीज झाले - निवृत्त न्या. के. डी. पाटील

Maratha Reservation : चार-पाच महिने राबल्याचे चीज झाले - निवृत्त न्या. के. डी. पाटील

कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली.

आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे न्यायालयात टिकणारच होते, याची खात्री होती, असेही श्री. पाटील म्हणाले. 

आयोगाच्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावताना आयोगाने दिलेल्या अहवालानुसार मराठा आरक्षणाचा निर्णय कायम ठेवला. या पार्श्‍वभूमीवर आयोगावर काम केलेल्या श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले,"भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 15 व 16 नुसार एखादा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तर अशा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देता येते. याबाबत आयोगासमोर काही व्यक्ती, संस्था व व्यक्तींच्या समुहाकडून कागदोपत्री पुरावे सादर केले होते. त्याशिवाय राज्य पूर्नरचना होण्यापुर्वी मराठवाडा त्यावेळच्या हैद्राबाद राज्यात, विदर्भ हा सीपी अँड बेरार तर पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण हा भाग त्यावेळच्या मुंबई राज्यात होता. त्यावेळी सुध्दा मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख त्या त्या राज्यांच्या अहवालात होता.' 

ते म्हणाले,"हा सर्व अभ्यास करताना मिळालेली कागदपत्रे व पुरावे यांची छाननी केली. त्यासाठी सलग चार-पाच महिने दिवस-रात्र काम केले. त्यातून मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याची भरभक्कम आकडेवारी आयोगाला प्राप्त झाली. त्या आधारे मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण नोकरी व शिक्षणात देता येते, या निर्णयाप्रत आयोग आला. उच्च न्यायालयात आयोगाने सादर केलेल्या अहवालातही त्याचा उल्लेख केला. हीच बाब उच्च न्यायालयाने उचलून धरली. त्यातून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. याचा आपल्याला आनंद होत आहे. 

के. डी. पाटील यांचा परिचय 
श्री. पाटील हे निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश आहेत. त्यांनी निवृत्तीपुर्वी अमरावती, नांदेड, ठाणे येथे काम केले आहे. ते मूळचे कसबा बावडा येथील रहिवाशी आहेत. मावळ येथील शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या चौकशी समितीचेही ते सचिव होते. वनविभागाचे विधी सल्लागार यासह विविध पदावर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com