बोटीतून भातकापणीची शेतकऱ्यांवर वेळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कोयना नदीच्या काठावर असलेल्या भात खाचरातील पीक कापणीस येऊनही पाणीपातळी कमी न झाल्यामुळे बोटीतून भात कापणी करावी लागत आहे. 

कास (जि. सातारा) - कंटाळा आणलेल्या पावसाने शेतीची अक्षरशः दैना केली असून, बामणोली, तापोळा परिसरात भात शेतीची दैना केली आहे. कोयना नदीच्या काठावर असलेल्या भात खाचरातील पीक कापणीस येऊनही पाणीपातळी कमी न झाल्यामुळे बोटीतून भात कापणी करावी लागत आहे. 

सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील पाटण, सातारा, जावळी व महाबळेश्वर या अतिपावसाच्या प्रदेशात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. सह्याद्री पर्वतरांगांच्या तीव्र उताराचा आणि लाल मातीचा हा भूप्रदेश आहे. येथे पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता पूर्णपणे वाहून जाते. त्यामुळे येथील शेतकरी डोंगर उतारावर दगडाचे बांध घालून ओढ्याच्या काठावर भात खाचरे बनवितात. त्यांची रचना उताराने एका खालोखाल एक अशा पध्दतीने असते. जेणेकरून कमी पावसात ओढ्याचे पाणी सर्वात वरच्या वावरात सोडले असता ते आपोआपच खालच्या वावरात पोचते. येथील शेतकरी उन्हाळ्यात पालापाचोळा व केरकचरा जाळून तरवे तयार करतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पेरणी करतात. भात रोपे एक महिन्याची झाल्यावर जुलै महिन्यात भात लावणी करतात. दसऱ्यानंतर हळव्या जातीच्या भात पिकाची कापणी सुरू होते. यावर्षी दसऱ्यानंतर दररोजच पाऊस पडत आहे. त्यामुळे तयार झालेले पीक कसे कापून घ्यायचे, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.  

कोयना धरण पूर्ण भरल्यानंतर दरवर्षी दिवाळीमध्ये पाणीपातळी चार ते पाच फुटांनी कमी होते. यावर्षी दिवाळीतही तसेच नोव्हेंबर महिन्यात शिवसागर जलाशय काठोकाठ भरल्याने नदीकाठावरील भात पीक कापणी कशी करायची, याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही हुशार शेतकऱ्यांनी आपल्या लाँच बोटी नदीकाठी नेऊन होडीतून भात कापणी करून घराकडे पळवत आहेत.

भातशेतीतून वर्षभराचा उदरनिर्वाह 
बामणोली व तापोळा परिसरात इतर कोणतेही पीक न घेता फक्त भात शेतीच केली जाते. त्यातून वर्षभराचा उदरनिर्वाह होतो. परंतु, हे नगदी पीक नसल्याने अनेक शेतकरी भात लावणी व भात कापणी हे दोन मुख्य हंगाम घेऊन इतर वेळी सातारा, मुंबई किंवा इतरत्र रोजगाराचे साधन निवडतात. अनेक शेतकरी भात लावणीसाठी व भात कापणीसाठी प्रत्येकी १५ दिवस सुटी घेऊन गावी येतात. इतर वेळी आपला रोजगार शहरांमध्ये करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the rice harvesting boat in satara