खरे लाभार्थी घरकुलांपासून दूरच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

कऱ्हाड - ज्यांनी आयुष्यभर घराचे स्वप्न पाहिले, असे अनेक खरे लाभार्थी आयुष्याच्या संध्याकाळीही शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांपासून वंचित असल्यामुळे अजूनही ते घराविना हालअपेष्टांचे जीवन जगत आहेत.

कऱ्हाड - ज्यांनी आयुष्यभर घराचे स्वप्न पाहिले, असे अनेक खरे लाभार्थी आयुष्याच्या संध्याकाळीही शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांपासून वंचित असल्यामुळे अजूनही ते घराविना हालअपेष्टांचे जीवन जगत आहेत.

शासनाने ज्यांना राहण्यासाठी घर नाही, जे अनेक वर्षे धोकादायक, जुन्या घरात राहतात त्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून सर्वांना घरे देण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे. मध्यंतरी सर्वांच्या घरोघरी जावून सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी सर्व्हे करणारांनी जी माहिती जमा केली, त्या आधारावर शासनाने काही निकष, अटी-शर्ती लावून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यादी तयार केली आहे. त्या सर्वेत मिळालेल्या माहितीवरून तयार करण्यात आलेल्या यादीतून ज्यांनी त्यांचे आयुष्य धोकादायक घर, कुडामेडाच्या घरात घालवले, ते त्या यादीत आलेच नाहीत. अनेकांना अशी यादी असते याची पुसटशी कल्पनासुध्दा नाही, असे अनेक गरजू लोक, महिला या यादीपासून वंचित राहिल्याने सर्व्हे कसा केला, याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

शासनाने केलेल्या यादीनुसार शासनाला जरी गरजूंना घरे दिली असे वाटत असले तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी या घरकुलांपासून वंचित राहिले आहेत. त्यातील अनेकजण साठी ओलांडलेले आहेत. त्यात हातावर पोट असणारी बहुतांश कुटुंबे आहेत. ज्यांनी जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी, निवाऱ्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला अशांना शासनाच्या योजनेतून घरे मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पण जागा नाही...
शासनाने केलेल्या सर्व्हेतून अनेकांची नावे घरकुलाच्या यादीत आली आहेत. मात्र, त्यातील अनेकांना जागाच नाही. त्यामुळे ते घरे बांधू शकत नाहीत व ज्यांच्याकडे जागा आहे, त्यांची नावे आली नाहीत असाही विरोधाभास यादीमध्ये दिसून येत आहे.

'आम्हाला कोणी वारस नाही. आमच्याकडे घर बांधण्यासाठी पैसेही नाहीत. आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. तरीही घरकुलाच्या यादीत आमची नावे नाहीत. यादी तयार करताना आमची घरे का दिसली नाहीत? ''
- वैशाली खोत, सुनंदा खोत, टेंभू.

Web Title: Right from the beneficiary gharakul toughest!

टॅग्स