वाळू उपसा रोखण्यासाठी येरळा नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर चरी

संतोष कणसे
Monday, 11 January 2021

वाळू उपसा रोखण्यासाठी वांगी, शेळकबाव येथे नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने चरी खोदून रस्ते बंद केले आहेत.

कडेगाव (जि. सांगली) : बंदी आदेश धाब्यावर बसवून येरळा नदी पात्रात वाळू माफियाकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. तो रोखण्यासाठी आता कडेगाव महसूल विभागाने कंबर कसली असून तालुक्‍यातील वांगी, शेळकबाव येथे नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने चरी खोदून रस्ते बंद केले आहेत.

तालुक्‍यातील वांगी, शिवणी, नेवरी, शेळकबाव, रामापूर, कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी या गावातील हद्दीत येरळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांनी उच्चाद मांडला आहे. तालुक्‍यात ताकारी, टेंभू योजनेचे पाणी आल्याचे आर्थिक सुबत्ता वाढली आहे. यातून मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामे सुरू आहेत. अनेक शासकीय कामेही सुरु आहेत. त्यासाठी मोठ्याप्रमाणात येरळा नदीतील उच्च दर्जाच्या वाळूची मागणी होते.

खर्चापेक्षा दहापट जादा पैसे वाळू तस्करांना मिळत आहेत. रात्रभर वाळू चोरुन दिवसा अलिशान गाडीतुन फिरणाऱ्या वाळू तस्करांचा तरूणाईवर प्रभाव पडत असल्याने अनेक याकडे वळले आहेत. यातुन गुन्हेगारीत वाढ झाली आहे. वाळूच्या वाहनांनी आतापर्यंत तालुक्‍यातील अनेक बळी गेले आहेत. 

वांगी व शेळकबाव येथे तर वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची गंभीर दखल तहसिलदार डॉ. शैलजा पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी व संबंधित वाळू तस्करावर कारवाई करण्याचे आदेश महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्याप्रमाणे गावकामगार तलाठी डी. एल. चौरे यांनी जेसीबीच्या सहाय्याने येथे येरळा नदी पात्राकडे जाणारे सर्व रस्त्यावर चरी खोदल्या आहेत. तसेच नदी पात्रात जेथे वाळू उपसा झालेला आहे. त्या ठिकाणच्या नदी पात्राचा पंचनामा करुन संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. 

गुन्हेही दाखल केले जाणार
तालुक्‍यात येरळा नदी पात्रात वाळू तस्करीबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महसूल विभागातील तलाठी व पोलीस प्रशासनास तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. येरळा नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर चरी मारण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधित वाळू तस्करावर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. 
- डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार, कडेगाव 

संपादन : युवराज यादव त्र्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road blocked leading to the Yerla River basin to prevent sand smuggling; In Revenue Action mode